‘जीवनदान’ अभियानाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले उद्घाटन

0

भुसावळ : मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या रक्तदान आवश्यकतेच्या आवाहनाला साथ देत जिह्यातील कोरोना प्रादुर्भाव, सद्यस्थितीतील रक्ताची उपलब्धता आणि संभाव्य गरज याची तयारी म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ तालुका शिवसेना पदाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांच्या संकल्पनेतून व शुभम सोनार यांच्या सहकार्याने रक्तदानासाठी http://www.jivandaan.in हे संकेतस्थळ व jivandaan अ‍ॅप विकसीत केले आहे. या संकेतस्थळाचे उद्घाटन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले व जीवनदान अभियानाची सुरुवात करण्यात आली. प्रसंगी जळगावचे आमदार राजुमामा भोळे, रक्तदानाचे विक्रमवीर मुकुंद गोसावी, भुसावळ शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य विश्वनाथ पाटील उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी केले कौतुक
शिवसेनां कार्यकर्ते जनसेवेसाठी नेहमीच तत्परतेने कार्य करीत असतात. एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज असल्यास आणि तिला वेळेवर रक्त मिळाल्यास त्या व्यक्तीचे प्राण वाचवण्याचे कौतुकास्पद व महत्त्वपूर्ण कार्य या संकेतस्थळाच्या माध्यमातून एका क्लिकवर कळणार आहे. अधिकाधिक दात्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील एक लाख दाते जोडणार : प्रा.धीरज पाटील
मानवाने विज्ञान-तंत्रज्ञानाची कास धरून कितीही प्रगती केली तरी आजपर्यंत कृत्रिम रक्त तयार करण्यात आजवर यश मिळवलेले नाही. विविध आजार व कारणांनी मानवास रक्ताची गरज भासत असते, अशावेळी त्याच तंत्रज्ञानाचा उपयोग करून रक्त उपलब्ध करून देणे हा ध्यास मनात मागील काही वर्षांपासून होता तो आज पूर्ण झाला आहे, या अभियानांतर्गत परीसरातील मित्र मंडळीच्या मदतीने महाराष्ट्रातील क लाख दात्यांना जोडण्याचा संकल्प केला आहे असे प्रा.धीरज पाटील यांनी सांगितले.

रक्तदानासाठी मोबाइल येईल संदेश
रक्तदानासाठी संकेतस्थळावर रक्तदात्यांनी नोंदणी करावी. रक्ताची गरज, अपेक्षित ब्लड ग्रुप आणि ब्लड बँक यांचा समन्वय साधून गरजूंपर्यंत ही सुविधा नेण्यात येईल. नोंदणी करण्यात येणार्‍या दात्यांना आवश्यकतेनुसार रक्तदानासाठी मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवून कळवण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरे भरवणे शक्य नसल्याकारणाने गरजवंताची माहिती दात्याला या प्रणालीमार्फत देणे सोपे झाले आहे, अशी माहिती शुभम सोनार याने दिली.

Copy