जीएसटी 1 जुलैपासून लागू होणार?

0

नवी दिल्ली: गेल्या दहा वर्षांपासून रखडलेला वस्तू आणि सेवा कर कायदा (जीएसटी) 1 जुलैपासून सर्व राज्यांमध्ये लागू केला जाईल, असा विश्‍वास केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला. 1 जुलैपासून हा कायदा लागू करण्यासाठी सर्व राज्यांनी तयारी दर्शवली आहे, असे त्यांनी सांगितले.

वस्तू आणि सेवा कर कायद्याबाबत राज्य आणि केद्र सरकारची बैठक झाली. या बैठकीनंतर ते बोलत होते. या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सर्व राज्यांचे एकमत होत नव्हते. त्यामुळे हा कायदा पुढे ढकलला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. या पार्श्‍वभूमीवर अर्थसचिवांनी व्यक्त केलेला विश्‍वास महत्त्वाचा मानला जात आहे.
देशातील सर्व राज्ये जुलैपासून हा कायदा लागू करण्यास तयार आहेत. या कायद्याची व्याप्ती खूप मोठी आहे. राज्य आणि केंद्र सरकार मिळून यावर काम करत आहे, असे दास यांनी सांगितले.

काय आहे जीएसटी?
अवाजवी करगुंता टाळून सुटसुटीतपणा आणणारा हा एक-सामाईक, किंबहुना एकमेव अप्रत्यक्ष कर संपूर्ण देशस्तरावर सारख्याच दराने लागू होईल. जाचक व भरमसाट करांच्या तुलनेत कमी व आकाराने लहान असलेल्या करांतून उलट अधिक महसूल गोळा व्हावा या दृष्टीने या कायद्याकडे पाहिले जाते.

हेे कर राहणारच
सीमाशुल्क कायम असेल. पेट्रोलियम उत्पादने, मद्य, तंबाखू आणि वीज करआकारणी या कायद्यातून वगळण्यात आली आहे. कृषीउत्पन्न बाजार समिती करही यातून वगळण्यात आला आहे.