जि.प.त सत्तांतरासाठी सेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीत खलबते

0

शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा : पद्मालय विश्रामगृह येथे झाल्या बैठका

जळगाव – जिल्हा परिषदेत भाजपाची असलेली सत्ता खेचून महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आज पद्मालय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाली. तसेच शिवसेनेचे नेते आ. गुलाबराव पाटील यांच्याशीही चर्चा करण्यात आली असुन महाविकास आघाडीसाठी तीनही पक्ष अनुकूल असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

जिल्हा परिषदेत गत 20 वर्षापासून भाजपाची सत्ता आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला यशस्वी झाल्यानंतर आता जिल्हास्तरावरही हा फॉर्म्युला अंमलात आणून भाजपाची सत्तास्थाने खालसा करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. जळगावच्या जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आता पुढील अडीच वर्षासाठी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी दि. 3 रोजी निवडणूक होणार आहे. सद्यस्थितीला जिल्हा परिषदेत भाजपा आणि काँग्रेस पक्षाची सत्ता असुन शिवसेना आणि राष्ट्रवादी हे विरोधकांची भूमिका बजावत आहेत. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या.

अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडुन दोन सदस्यांची नावे

ज्यांची संख्या अधिक त्यांचेच अध्यक्ष असा पॅटर्न राज्यात महाविकास आघाडीने निश्चीत केला आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा परिषदेत अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य अधिक असल्याने अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होईल अशी माहिती जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी दिली. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील व चोपडा येथील जिल्हा परीषद सदस्या डॉ. निलम पाटील या दोघांची नावे चर्चेत आहे. आता अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीची संयुक्त बैठक

शहरातील पद्मालय या शासकीय विश्रामगृहात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आ. अरूणभाई गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, आ. अनिल पाटील, माजी आ. संतोष चौधरी, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद गटनेते शशिकांत साळुंखे, अरूण पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष राजीव पाटील, प्रदेश सचिव डी.जी.पाटील, वाल्मीक पाटील यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी दिली. तसेच शिवसेनेचे उपनेते आ. गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा झाली असुन काँग्रेस पक्षाचे सदस्य देखिल अनुकूल असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीकडुन व्हीप जारी

राष्ट्रवादी काँग्रेसकडुन जिल्हा परिषदेच्या 15 सदस्यांना अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी व्हीप बजावण्यात आला असुन सर्व सदस्यांच्या लेखी स्वाक्षर्‍या घेण्यात आल्याचे अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी सांगितले. शिवसेनेचे आ. गुलाबराव पाटील यांनीही त्यांच्या सदस्यांना निवडणूकीसंदर्भात सुचना दिल्या असल्याचे ते म्हणाले.

काँग्रेसमध्ये चर्चा सुरूच

जिल्हा परिषदेत गेल्या अडीच वर्षापासून भाजपासोबत आघाडी करून काँग्रेस सत्तेत सहभागी आहे. आता मात्र राज्यात परिवर्तन झाल्यानंतर जिल्हा परिषदेतही परिवर्तन करण्यासाठी काँग्रेसच्या भूमिकेकडे राष्ट्रवादी आणि सेनेचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे जिल्हा परिषदेत चार सदस्य असुन या चारही सदस्यांसोबत काँग्रेसचे निरीक्षक माजी आ. अनिल आहेर हे चर्चा करीत आहे. रात्री उशिरापर्यंत ही चर्चा सुरूच होती.

Copy