जि.प.अध्यक्षपदासाठी तीन नावे आघाडीवर

0

रावेर तालुक्यातून दोन तर भुसावळमधून एक नाव आघाडीवर; उपाध्यक्षपदासाठी मधुकर काटे आघाडीवर

जळगाव: जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड नवीन वर्षात होत आहे. ३ जानेवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष तर ६ जानेवारीला विषय समिती सभापतींची निवड होणार आहे. जि.प.वर भाजपचीच सत्ता कायम राहील हे जवळपास निश्चित आहे. नवीन वर्षात अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती पदाची लॉट्री कोणाला लागणार?याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. रावेर लोकसभा मतदार संघातून अध्यक्ष आणि जळगाव लोकसभा मतदार संघातून उपाध्यक्ष देण्यावर भाजपचे एकमत झाले आहे. सर्वसाधारण महिला आरक्षण राखीव असल्याने अध्यक्ष पदासाठी तीन महिला जि.प. सदस्यांची नावे अधिक आघाडीवर आहेत. तर उपाध्यक्ष पदासाठी सध्यातरी मधुकर काटे यांचेच नाव आघाडीवर आहे. काल शनिवारी अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या निवासस्थानी भाजपच्या सर्व जि.प.सदस्य यांची बैठक माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत झाली. यात सत्तेचा आणि निवडीचा फॉर्म्युला ठरला आहे.

‘हे’ तीन नाव चर्चेत

भाजपा अंतर्गत सुरुवातीलाच ठरल्याप्रमाणे यावेळेला अध्यक्षपद रावेर लोकसभा मतदार संघाकडे जाणार आहे, यावर भाजपात दुमत नाही. अध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागते? हे ३ जानेवारीला स्पष्ट होईल. मात्र भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या वहिनी पल्लवी प्रमोद सावकारे, पाल-केऱ्हाळे गटाचे नंदा अमोल पाटील आणि ऐनपुर-खिरवड गटाचे रंजना प्रल्हाद पाटील हे तीनच नाव सध्या तरी अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे.

सावकारेंच्या नावाला खडसेंची पसंती?

माजी मंत्री एकनाथराव खडसे हे सध्या भाजपात नाराज आहेत. मात्र असे असले तरी पक्ष सोडण्याची शक्यता नाही. खडसे यांच्या वाईट काळात कायम त्यांच्या सोबत असलेल्यांमध्ये भुसावळचे आमदार संजय सावकारे यांचा समावेश आहे. विधानसभेला खडसे यांची उमेदवारी निश्चित नव्हती तोपर्यंत सावकारे यांनी अर्ज देखील भरला नव्हता. आता खडसे यांचे जवळचे म्हणून सावकारे यांच्या वहिनी पल्लवी सावकारे यांना संधी मिळू शकते. भाजपच्याच सदस्यांचे काही नावाला विरोध आहे मात्र सावकारेंच्या नावाला कोणाचेही विरोध नसल्याचे दिसून येते. या जमेच्या बाजू सावकारेंचे असल्याने त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीबाबत संभ्रम

जिल्हा परिषदेवरील सत्ता ताब्यात घेण्यासाठी राज्याच्या धर्तीवर जिल्ह्यातही महाविकास आघाडीचा फॉर्म्युला यशस्वी करण्यावर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून चाचपणी सुरु झाली होती. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांनी बैठका घेऊन महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्याबाबत दावा केला आहे. मात्र तिन्ही पक्ष एकत्र येऊनही महाविकास आघाडीला बहुमत मिळत नाही हे वास्तव आहे. परंतु भाजपचे काही सदस्य फुटतील या अपेक्षेनेच महाविकास आघाडीने सत्तेचा दावा केला आहे. मात्र खडसेंनी पक्ष सोडणार नसल्याचे जाहीर केल्याने भाजपात फुट पडण्याची शक्यता नाही. दुसरीकडे भाजपकडून पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी हालचाली सुरु असताना महाविकास आघाडीकडून हालचाली नसल्याचे दिसून येते. आज होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारतच महाविकास आघाडीचे आमदार व्यस्त आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जिल्हा परिषदेत धूसर बनला आहे.

भाजपच्या जि.प.सदस्य सहलीला रवाना

जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूक नवीन वर्षात ३ जानेवारीला होत आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर ६ जानेवारीला विषय समिती सभापती निवड होणार आहे. तत्पूर्वी शनिवारी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत भाजपच्या सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि पक्ष नेत्यांची बैठक झाली. यात अध्यक्ष रावेर लोकसभा मतदार संघातून तर उपाध्यक्ष जळगाव लोकसभा मतदार संघातून करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. जि.प.पदाधिकारी निवडीमुळे राजकारण तापले आहे. बहुमत नसतानाही महाविकास आघाडीने देखील जि.प.वर सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर फोडाफाडीचे राजकारण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून भाजपचे सर्व जिल्हा परिषद सदस्यांना सहलीवर पाठविण्यात आले आहे. रविवारी दुपारी भाजपचे सर्व सदस्य ३ जानेवारीपर्यंत सहलीवर गेले आहेत.

अध्यक्ष बंगल्यावरून सदस्य सहलीसाठी रवाना झाले. सुरुवातीला सर्व सदस्य शहराबाहेरीलच कोल्हे हिल्सवरील एका हॉटेलात थांबणार होते अशी माहिती मिळाली. त्यानंतर पुढील नियोजन करण्यात येणार आहे. सदस्यांनी ३ जानेवारीपर्यंत थांबण्याच्यादृष्टीने नियोजन केले आहे. त्यासाठी आवश्यक सर्व साहित्य घेऊनच सदस्य घरून रवाना झाले आहे. रवाना होण्यापूर्वी पक्ष श्रेष्ठींकडून आवश्यक सूचना केल्या आहेत. नाराज सदस्यांची मनधरणी करण्यात पक्षाला यश आले असल्याने भाजपला सत्ता स्थापनेसाठी कोणतीही अडचण नसल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे.

Copy