जिवसृष्टीचा उगम धुमकेतूवरील मूलद्रव्यांमुळे

0

चोपडा । पृथ्वीवरील जिवसृष्टीचा उगम धूमकेतूवरील रासायनिक मूलद्रव्यांमुळे सुरु झाली. कालपरत्वे त्यापासून एक पेशी प्राणी ते मानव अशी उत्क्रांती झाली, असे सांगून जीवसृष्टी निर्मितीच्या आख्यायिका साफ चुकीच्या असल्याचे प्रतिपादन जर्मन संशोधक प्रा.वॅालफ्रॅम थीमन यांनी येथे केले. येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिरात शताब्दी वर्षानिमित्त तालुक्यातील विज्ञान शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी आयोजित ज्ञानप्रबोधन कार्यक्रमात प्रा.थीमन बोलत होते. यावेळी मंचावर संस्थेच्या सचिव माधुरी मयूर, जर्मनी येथील मानसशास्त्रज्ञ डॅा.मोनिका, मुख्याध्यापिका अरूणा पाटील, प्रा.डॉ.पी.एस.लोहार आदी मंचावर उपस्थित होते.

धुमकेतूवरील रासायनिक मूलद्रव्याबाबत दिली माहिती

यावेळी या कार्यक्रमात प्रा.थीमन यांचा परिचय, स्वागत, प्रास्ताविक सचिव मयूर यांनी केले. प्रा.थीमन हे जर्मनीच्या ब्रेमन विद्यापीठात अ‍ॅस्टो बॅायोलॅाजी या विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी युरोपियन स्पेस एजन्सी मार्फत सोडलेल्या ‘रोझेटा’ या आंतराळ यानाच्या सहाय्याने 67/पी या धुमकेतूवर यान उतरवून त्याठिकाणच्या मूलद्रव्यांचा अभ्यास केला.

मोहिमेची माहिती देतांना प्रा.थीमन म्हणाले की, धुमकेतूवरील रासायनिक मूलद्रव्यांची संरचना पृथ्वीवरील पाणी व अ‍ॅमिनो अ‍ॅसिड यांच्याशी मिळती जुळती आहे.याबाबतचे संशोधन जगातील प्रतिष्ठित ’सायन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.पृथ्वीवरील जीवसृष्टी निर्माण होण्यास या दोन्ही घटकांची भूमिका महत्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. जीवसष्टीबाबतच्या आख्यायिका साफ चुकीच्या असल्याचे परखड मत त्यांनी मांडले. प्रा.थीमन यांच्या भाषणाचा सारांश प्रा.डॅा.लोहार यांनी उपस्थिती विज्ञानप्रेमींपर्यंत पोहचविला. तसेच भाषणानंतरच्या प्रश्नांना प्रा.थीमन यांनी समयोचित उत्तरे दिली.

यांची होती उपस्थिती

यावेळी तालुक्यातील विविध शाळांमधील मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक आदी हजर होते. तसेच उपमुख्याध्यापक आर.बी.देशमुख, डी.एस.पांडव, पर्यवेक्षक डी.व्ही.याज्ञिक, ए.टी.पाटील, सुनिल पाटील, नागलवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक वाय.के.दिसावल, गोविंद गुजराथी, प्रा.उल्हास गुजराथी सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रफुल्ल जोशी यांनी केले. तर आभार मुख्याध्यापिका अरूणा पाटील यांनी मानले.