जिल्ह्यास राष्ट्रीय पुरस्कार

0

नवी दिल्ली । बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ या केंद्र शासनाच्या अभियानाची उत्कृष्ट अंमलबजावणी करण्यासाठी महाष्ट्रातील जळगाव व उस्मानाबाद जिल्ह्यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मेनका गांधी यांनी जळगावच्या जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल आणि उस्मानाबाद चे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ अभियानाचा दूसरा वर्धापन दिन तसेच ‘राष्ट्रीय बालिका दिना’चे औचित्य साधून येथील प्रवासी भारतीय केंद्रात एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मेनका गांधी, महिला व बाल विकास सचिव लीना नायर, रिओ पॅराऑलम्पिक विजेत्या दिपा मलिक, फ्लाईंग ऑफीसर अवनी चतुर्वेदी, पद्श्री गिर्यारोहक अरूनिमा सिन्हा, गिर्यारोहक रेखा चोकन या मंचावर उपस्थित होत्या. यासह दिल्लीस्थित शाळेकरी विद्यार्थ्यांनी, महिला व मुलींसाठी कार्यरत गैरसरकारी संस्था, अंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत संस्थांचे प्रतिनिधी मोठया प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमात ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ अभियानातंर्गत देशभरातील 10 जिल्ह्यांना पुरस्कृत करण्यात आले. त्यामध्ये उस्मानाबादसह जळगावला गौरविण्यात आले.

‘डिजीटल गुड्डा-गुड्डी’चा सन्मान : जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांच्या नेतृत्वात जिल्ह्यामध्ये ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ अंतर्गत सर्वसमावेशक जागृकता अभियान राबविण्यात आले. यासाठी डिजीटल इंडिया उपक्रमातंर्गत या अभियानाला जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ या अभियानाच्या लोगोचा उपयोग करून ‘डिजीटल गुड्डा-गुड्डी’ बोर्ड तयार करण्यात आला. यामध्ये ऑनलाईन जोडणीकरून मुला-मुलीच्या जन्मदराचे अवलोकन करता येते. हे एक ऑडीओ व्हिज्युअल डिस्प्ले कटआऊट आहे. या डिस्पलेवर मान्यवरांचे संदेश, कन्याभ्रुण हत्या विरोधी जनजागृतीपर संदेश, महिला सक्षमीकरणाबाबतच्या योजना, महिलासंदर्भांत महत्वाचे असणारे टोल फ्री क्रमांक आदी माहिती प्रसारीत केली जाते. जिल्हा व तालुका स्तरावरील शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत व आरोग्य केंद्रामध्येही बोर्ड दर्शनिय भागात बसविण्यात आले आहेत. याच्या परिणाम हा सकारात्मक झाला असून जळगाव जिल्ह्यामध्ये मुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे. 2011 मध्ये दर हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर 842 होता. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अंतर्गंत राबविण्यात आलेल्या उपक्रमानंतर हा जन्मदर 2015 मध्ये 863 तर 2016 मध्ये हा 922 पर्यंत पोहोचला असल्याचे श्रीमती अग्रवाल यांनी सांगितले.

शर्मा यांची संकल्पना
डिजीटल गुड्डा-गुड्डी बोर्ड हा पत्रकार आनंद शर्मा यांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आला आहे. त्यांच्या प्रयत्नांना जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी प्रशासकीय पातळीवर गती दिली. तर रक्षाताई खडसे आणि ए.टी. पाटील या खासदारद्वयीने केंद्रीय पातळीवर याला पोहचवले. केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी तसेच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाचे तोंड भरून कौतुक केले आहे. यातच आता या प्रोजेक्टला केंद्रीय पातळीवर पारितोषिकाने गौरविण्यात आले आहे.