जिल्ह्यात 876 आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत

1

जळगाव (प्रदिप चव्हाण) केंद्र राज्य सरकारच्या विशेष प्रयत्नाने ई पंचायत प्रकल्पांतर्गत विविध सुविधा अधिक सक्षमपणे नागरिकांपर्यत पोहोचविण्यासाठी आणि नागरिकांना विविध सेवा देण्याच्या हेतूने राज्यातील सर्व पंचायत समिती आणि ग्रामपंचायतमध्ये 2011-15 या कालावधीत संग्राम सेवा सुरु करण्यात आले होते. आता या प्रकल्पाचा पुढील टप्पा ग्राम विकास विभाग आणि माहिती तंत्रज्ञान संचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या आपले सरकार सेवा केंद्राने घेतले. सद्य स्थितीत जळगाव जिल्ह्यात 876 ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत आहे. या अगोदर जिल्ह्यात 944 संग्राम सेवा केंद्रे तर 895 कामगार (ऑपरेटर) कार्यरत होते. 15 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतीने स्वतंत्र आपले सरकार सेवा केंद्राची कामे करीत आहेत तर 15 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणार्‍या ग्रा.पं.तीने स्वेच्छेने सेवा केंद्रे सुरु केली आहे.
सेवा केंद्रातील सेवा
संगणकीकृत दाखले, यामध्ये जन्म नोंदणी प्रमाणपत्र, मृत्यू नोंदणी, रहिवासी दाखला, विवाहाचा दाखला, नोकरी व्यावसायासाठी नाहरकत प्रमाणपत्र, मालमत्ता फेरफार प्रमाणपत्र पत्र, नादेशप्रमाणपत्र, बेरोजगार प्रमाणपत्र, वीज जोडणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र, योजनेचा फायदा घेतला नसल्याने प्रमाणपत्र, शौचालय दाखला, बांधकाम अनुमती प्रमाणपत्र, नळ जोडणी अनुमती प्रमाणपत्र निराधार योजनेसाठी वयाचा दाखला, दारिद्र्यरेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र हयातीचा दाखला, अशी ही सुविधा मिळणार आहे.

ग्रा.पं. ने स्वेच्छेने घेतले सेवा केंद्राचे काम
संग्राम सेवा केंद्र बंद झाल्यानंतर जिल्ह्याभरातील ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्रे सुरु करण्यात आले. काही ग्रामपंचायतीने स्वतंत्ररित्या आपले सरकार सेवा केंद्राचे काम स्विकारले तर काही ग्रा.पं.तीने स्वेच्छेने काम स्विकारले. तर काहींनी क्लस्टर प्रमाणे सेवा केंद्रे स्थापन केले आहे. जिल्ह्यातील 15 लाखा पेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या 396 ग्रामपंचायतने स्वतंत्ररित्या आपले सरकार सेवा केंद्र स्थापन केले आहे. तर 15 लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या 226 ग्रामपंचायतने स्वेच्छेने आपले सरकार सेवा केंद्राचे काम करीत आहे. 15 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ग्राम पंचायतींना केंद्रासाठी उत्सुक असल्यास त्यांना आर्थिक भर द्यावा लागणार आहे. भौगोलिक स्थिती ग्राम पंचायतीची आर्थिक क्षमता लक्षात घेऊन ग्राम पंचायतीचे गट तयार करण्यात येणार आहे.

जुने संग्राम केंद्र 944
जिल्ह्यात ऑनलाईनचे कामे करण्यासाठी 944 संग्राम केंद्रे होती. ही संग्राम केंद्र आता बंद करण्यात आली आहे. संग्राम सेवा केंद्राची जागा आपले सरकार सेवा केंद्राने घेतल्याने संग्राम केंद्रात कार्यरत असलेल्या 895 ऑपरेटर कामगारांच्या रोजगारांचा प्रश्‍न निर्माण झाला होता. जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्राच्या स्थापनेवेळी या ऑपरेटर कामगारांची संमती घेण्यात आली असून त्यांनी आपले सरकार सेवा केंद्र स्थापनेला मान्यता दिली आहे.