जिल्ह्यात 103 बँक शाखांतर्फे पीक कर्ज मेळावा

0

अर्ज छाननीनंतर 1 हजार 362 शेतकर्‍यांना मंजुरी
नंदुरबार: शेतकर्‍यांना पीक कर्जाचे अर्ज भरण्यास सुलभ व्हावे, यासाठी जिल्ह्यात 103 बँक शाखांतर्फे विविध गावात पीक कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्यात 2 हजार 216 शेतकर्‍यांनी पीक कर्जासाठी अर्ज भरले. त्यापैकी 1 हजार 362 शेतकर्‍यांना 9 कोटी 74 लाखांच्या कर्जाला अर्ज छाननीनंतर तात्काळ मंजूरी देण्यात आली. उर्वरित शेतकर्‍यांना अर्जाच्या छाननीनंतर कर्ज मंजूर करण्यात येणार आहे.
पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी मेळाव्याच्या माध्यमातून अधिकाधिक शेतकर्‍यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी परिसरातील गावातील शेतकर्‍यांना मेळाव्यात सहभागी करून घेण्याचे निर्देश दिले होते.शेतकर्‍यांनी बँकेच्या प्रतिनिधींकडून अर्ज भरण्याविषयी माहिती देण्यात आली. त्यांच्याकडून मेळाव्याच्या ठिकाणी अर्ज भरून घेत कागदपत्रांच्या पुर्ततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कागदपत्रांची पुर्तता करणार्‍या शेतकर्‍यांना पीक कर्ज मंजूर झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.

9 कोटी 45 लाखांचे कर्ज मंजूर
खासगी व राष्ट्रीय बँकांच्या 103 शाखांच्या माध्यमातून 1 हजार 892 शेतकर्‍यांचे अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 1 हजार 276 अर्ज मंजूर करण्यात आले. त्यात 9 कोटी 45 लाखांचे कर्ज मंजूर करण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून 324 अर्ज भरून घेण्यात आले. त्यातील 68 अर्ज मंजूर करण्यात आले असून मंजूर रक्कम 29 लाख 7 हजार आहे. उर्वरित शेतकर्‍यांना पुढील 8 ते 10 दिवसात अर्जाची छाननी करून कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया यापुढेही सुरू राहणार आहे. शेतकर्‍यांना अर्ज मिळण्यासाठी प्रशासनातर्फे पाठपुरावा करण्यात येणार आहे.

पीक कर्जासाठी अर्ज भरून घेताना कोविड आजाराच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. शेतकर्‍यांना मास्क वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच सॅनिटायझरचा वापरही करण्यात आला. पीक कर्ज मेळाव्यासाठी प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी आणि बँकेच्या प्रतिनिधींनी चांगली कामगिरी केल्याबद्दल डॉ.भारुड यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आधार प्रमाणिकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र शेतकर्‍यांनी आपले सरकार सेवा केंद्रात जावून आधार प्रमाणिकरण करून घ्यावे. अशा शेकर्‍यांनाही पीक कर्जासाठी अर्ज करता येणार आहे, असेही जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

Copy