जिल्ह्यातील 75 पोलिस कलेक्टर मुख्यालयी महिनाभरासाठी जमा

0

जिल्हा पोलिस अधीक्षक विशेष नवचैतन्य कोर्समधून रूजवणार सकारात्मक दृष्टीकोन

जळगाव- पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंदे रोखण्यास सपशेल अपयशी ठरलेल्या तीन निरीक्षकांच्या उचल बांगडीनंतर कलेक्शन करणार्‍या जिल्हाभरातील तब्बल 75 पोलिस कर्मचार्‍यांना तडकाफडकी जिल्हा पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी जमा केले असून विशेष नवचैतन्य कोर्सच्या माध्यमातून त्यांच्यात सकारात्मक दृष्टीकोन रूजवला जाणार आहे. विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या आदेशानंतरही जिल्ह्यात अवैध धंदे खुलेआम आहेत. स्थानिक पोलिसांकडून नावालाच होत असलेल्या कारवाईनंतर वरीष्ठ स्तरावरून धाडी टाकल्यानंतर चित्र ‘जैसे थे’ असल्याने सुरूवातीला मुक्ताईनगरचे अशोक कडलग त्यानंतर गुरूवारी जळगाव एमआयडीसीचे निरीक्षक अनिरूद्ध आढाव व पारोळ्याचे विलास सोनवणे यांची अकार्यकारी पदावर नियुक्ती करण्यात आल्याने जिल्हा पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पोलिस ठाण्यातील कलेक्टरांचे होणार समुपदेशन
पोलिस ठाण्यासाठी कलेक्टरची भूमिका बजावणार्‍या 75 पोलिस कर्मचार्‍यांना तडकाफडकी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी एका महिन्याच्या विशेष नवचैतन्य प्रशिक्षणासाठी जळगाव मुख्यालयात पाचारण केले आहे. 23 नोव्हेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीत बायोमेट्रिक पद्धतीने सकाळ, दुपार, रात्री अशी तीन वेळा हजेरी घेवून प्रशिक्षण दिले जाणार आहे. राखीव पोलिस उपनिरीक्षक राजू पवार हे प्रमुख प्रशिक्षक असणार असू अन्य तीन कवायत निर्देशक प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत.

कर्मचारी जमा झाले अधिकार्‍यांचे काय?
कलेक्शन करणार्‍या कर्मचार्‍यांना समुपदेशनासाठी महिनाभर जळगावात जमा करण्यात आले असलेतरी त्यांच्यावरील अधिकार्‍यांचे काय? असा प्रश्‍न आता सर्वसामान्य जनता उपस्थित करीत आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे यांची भूमिका स्वागतार्ह व कौतुकास्पद असलीतरी जिल्ह्यात शोधून एकही पोलिस ठाणे नाही त्या हद्दीत अवैध धंदे नाहीत? अशा पार्श्‍वभूमीवर अधीक्षक काय भूमिका घेतात? याकडे लक्ष लागले आहे.

पोलिसांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन रूजवणार -पोलिस अधीक्षक
एका महिन्यांच्या नवचैतन्य कोर्समध्ये या कर्मचार्‍यांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन रूजवला जाणार असून त्यांची नियुक्ती कायदा-सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठीच आहे याबाबत समूपदेशन केले जाणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे म्हणाले. त्या-त्या पोलिस ठाण्यांच्या निरीक्षकांबाबतही नियोजन केले असल्याचे त्यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.

Copy