Private Advt

जिल्ह्यातील 50 टक्के नागरिकांनी घेतले लसीचे दोन्ही डोस

वर्षभरात लसीकरणाच्या मोहिमेला वेग ; बुस्टर डोसलाही सुरवात

जळगाव ः कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी गतवर्षी याच दिवशी कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. वर्षभरानंतरची स्थिती पाहता लसीकरणाचा पहिला डोस 80 टक्के तर दुसरा डोस 50 टक्के नागरिकांनी घेतला आहे. या लसीकरणामुळेच तिसर्‍या लाटेतील ओमिक्रॉनबाधितांना केवळ लक्षणे दिसत आहेत. सर्वांनाच रुग्णालयात दाखल होऊन ऑक्सिजनची गरज भासत नाही, असा दावा आरोग्य यंत्रणेने केला आहे.

सध्याच्या काळात कोरोना झालेल्या अनेकांना केवळ गोळ्या- औषधी देत गृहविलगीकरणात ठेवण्यात येत आहे. 16 जानेवारी 2021 रोजी जिल्हा प्रशासनातर्फे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली. अगोदर आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्करांना लस देण्यात आली. नंतर पोलिस, महसूल अधिकारी, कर्मचारी यांना लस दिली. नंतर 45 वर्षांवरील नागरिकांना नंतर 18 वर्षावरील नागरिकांना लसीकरण सुरू झाले.
पोलिसांच्या उपस्थितीत लसीकरण
लसीकरणाच्या ऑनलाइन नोंदणीवरून अनेक ठिकाणी गोंधळही झाले. पोलिसांच्या उपस्थितीत लसीकरण करावे लागले. लसीकरणासाठी पहाटे चारपासून नागरिक विविध लसीकरण केंद्रावर रांगेत उभे राहत असल्याचे चित्र पोहावयास मिळत होते. मात्र जशी दुसरी लाट ओसरली तसे लस घेण्याचे प्रमाणही घटले. अनेक ठिकाणी आता लसीकरण केंद्रे ओस पडलेली दिसून येतात. आता याच महिन्यापासून 15 ते 18 वयोगटातील युवकांचे लसीकरण सुरू झाले आहे. युवकांचा चांगला प्रतिसाद लसीकरणास मिळत आहे. अनेक नागरिकांनी लस घेतली आहे. मात्र त्याची पोर्टलवर नोंदणी नसल्याने ती आकडेवारी आतापर्यंत झालेल्या लसीकरणात नाही. नोंद न झालेल्या नागरिकांची संख्या तीन ते चार टक्के आहे.
असे झाले लसीकरण
* आरोग्य, फ्रंटलाईन वर्कर्स–1 लाख 20 हजार 971
* 18 ते 45 वर्ष वयोगट—20 लाख 25 हजार 666
* 45 ते 60 वयोगट—–9 लाख 41 हजार 633
* 60 वर्षावरील गट– 8 लाख 966
एकूण—39 लाख 47 हजार 356