जिल्ह्यातील भाजपचे पहिले आमदार व खासदार डॉ. गुणवंतराव सरोदे यांचे निधन

0

जळगावातील खाजगी रूग्णलयात उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत

जळगाव । जिल्ह्यातील भाजपचे पहिले आमदार व खासदार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य तथा भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. गुणवंतराव रामभाऊ सरोदे (वय 78) यांचे रविवारी दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याने जळगाव शहरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना रविवारी दुपार सव्वा बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. सावदा, ता. रावेर येथे रविवारी दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. निधनाचे वृत्त कळताच भाजपासह विविध पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेतली.

डॉ. गुणवंतराव सरोदे यांनी महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे माजी उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी संभाळली होती. त्यांच्या सावदा येथील शामल हॉस्पिटल, बसस्थानकाजवळ, या राहत्या घरुन सायंकाळी 4 वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार असून भारतेश्‍वर मंदिराजवळील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नी श्रीमती श्यामला यांचे निधन झाले होते. डॉ. सरोदे यांच्या पश्‍चात मुलगा अतुल व सून प्रिया, दोन मुली किशोरी व विद्या असा परिवार आहे.

1985 मध्ये प्रथमच ते रावेरमधून आमदार
डॉ. गुणवंत सरोदे यांचा जन्म रावेर तालुक्यातील मस्कावद येथे 3 एप्रिल 1940ला झाला. वैद्यकीय (एमबीबीएस) शिक्षर त्यांनी पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर रावेर तालुक्यातील सावदा येथे वैद्यकीय सेवा सुरु केली. ग्रामीण भागातील गरीबांचा डॉक्टर म्हणून त्यांना ओळखले जायचे. बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या डॉ. सरोदे यांनी 1978मध्ये तत्कालीन जनता पार्टीच्या तिकिटावर रावेर विधानसभेची निवडणूक लढली. 1980मध्ये स्थापन भाजपचे ते जळगाव जिल्ह्याचे संस्थापक अध्यक्ष होते. 1985मध्ये प्रथमच ते रावेरमधून आमदार झाले.

जिल्ह्यात भाजपचे पहिले आमदार व खासदारीकाचा मान
1989 मध्ये त्यावेळच्या जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र, 1991मध्ये लोकसभेवर पहिल्यांदा निवडून गेले. 1996मध्ये त्यांना खासदार म्हणून पुन्हा पसंती मिळाली. जळगाव जिल्ह्यात भाजपचे पहिले आमदार व पहिले खासदार होण्याचा मान डॉ. सरोदेंना जातो. 1995मध्ये भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी होती. अलीकडेच 2016 ला उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते अमृतमहोत्सवानिमित्त डॉ. सरोदेंचा भव्य नागरी सत्कार सोहळा झाला होता.

Copy