Private Advt

जिल्ह्याच्या विकासासाठी द्यावेत एक हजार चारशे कोटी : पालकमंत्र्यांचे केंद्रीय मंत्री गडकरी यांना निवेदन

जळगाव : जिल्ह्यातील महत्वाचे मार्ग पूर्ण झाले असले तरी अजून अनेक मार्गांचे काम बाकी आहेत. यात प्रामुख्याने जळगावातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या ऐवजी थेट गिरणा नदीपासून ते तरसोद फाट्यापर्यंतच्या मार्गाचे विस्तारीकरण करून या मार्गावर उड्डाण पुल उभारावा यासह अन्य मागण्यांचे निवेदन शुक्रवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यातर्फे केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आले.

1400 कोटींच्या निधीची मागणी
यासोबत जिल्ह्यातील इतर महत्वाच्या मार्गांचे काम देखील ना. गडकरी यांनी मार्गी लावावे अशी अपेक्षा सुध्दा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. या सर्व कामांसाठी केंद्रीय रस्ते निधी (सीआरएफ) अंतर्गत 1400 कोटी रूपयांच्या निधीची मागणी पालकमंत्र्यांनी केली आहे. आज शिवतीर्थ मैदानावरील महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री बोलत होते. केंद्रीय नागरी वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत जळगावातील शिवतीर्थ मैदानावर राष्ट्रीय महामार्गांचे लोकार्पण सोहळा पार पडला. याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी विविध मागण्यांचे निवेदन नितीन गडकरी यांना दिले.

तर सुटणार वाहतूक समस्या
या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरातील रस्त्याचे दुहेरीकरण करण्यात आले असले तरी यामुळे वाहतुकीची समस्या सुटलेली नाही. यामुळे या मार्गाचे चौपदरीकरण करून यात गिरणा पुलापासून ते थेट तरसोद फाट्यापर्यंत सुमारे नऊ किलोमीटर लांबीचा उड्डाण पुल उभारण्यात यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व वर्दळीच्या रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन त्यांचे विस्तारीकरण करण्यात यावे, अशी मागणीदेखील यात करण्यात आली आहे.