जिल्हा सामान्य रूग्णालयास एमआरआय मशीन मंजूर

0

ना. गुलाबराव पाटील यांचा पुढाकार


जळगाव: राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी पदभार स्वीकारण्याआधीच जिल्हयाच्या विकासाच्या दृष्टीने आपली जबाबदारी निभावली आहे. मुंबई येथील श्री सिद्धीविनायक ट्रस्टच्या माध्यमातून जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी एमआरआय मशीन मंजूर करून घेतले आहे.

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी आज मंत्रिपदाचा पदभार स्विकारण्याआधी मुंबई येथील सिद्धीविनायक मंदिरात गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. यावेळी ट्रस्ट अध्यक्ष आदेश बांदेकर, सुनील चौधरी, संपर्कप्रमुख तथा विश्वस्त संजय सावंत, पन्नालाल पाटील, स्वीय सहाय्यक गोविंद पाटील यांची उपस्थिती होती. दर्शनानंतर ना.गुलाबराब पाटील यांनी सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्याकडे निवेदन देत जळगाव जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रूग्णालयास ट्रस्टच्या माध्यमातून एमआरआय मशीन मिळावे अशी विनंती केली. ना.गुलाबराब पाटील यांच्या विनंतीला मान देत त्यांनी याबाबत तत्काळ दखल घेत सामान्य रूग्णालयास मशीन देण्याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे.

रुग्णांची होणार सोय

पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने आठवडाभरात सामान्य रूग्णालयास एमआरआय मशीन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गरीब, गरजू रूग्णांनादेखील अल्पदरात सेवा उपलब्ध होणार आहे. गोरगरीब जनतेची होणारी पिळवणूक यानिमित्ताने थांबणार आहे. ना.पाटील यांच्या पदभार स्विकारण्याआधीच केलेल्या पहिल्याच जनसवेच्या कामाने जिल्ह्याला मोठी उपलब्द्धी मिळणार आहे.

जिल्हा शल्य चिकित्सकांना सूचना

श्री सिद्धिविनायक ट्रस्टच्या अध्यक्षांनी होकार दर्शविताच ना.गुलाबराब पाटील यांनी तात्काळ जिल्हा शल्य चिकित्सकांशी फोनद्वारे संपर्क केला. एमआरआय मशीन मिळणेबाबत तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.