जिल्हा बँक शाखेच्या व्यवस्थापकाकडून शिवसेनेचे जि.प.चे माजी उपाध्यक्ष आमले यांना मारहाण

एरंडोल पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल

एरंडोल:-जिल्हा बँकेचे निपाणे शाखा व्यवस्थापक दिनेश उत्तमराव पाटील यांनी पिक कर्ज प्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले यांना शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना १९ मे बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास महात्मा फुले पुतळा परिसरात घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला आमले यांनी दिलेल्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा जवखेडे सिम येथील शेतकरी ज्ञानेश्वर आमले हे जिल्हा बँकेच्या निपाणे येथील शाखेत पीक कर्जाचे पैसे घेण्यासाठी गेले असता. त्यांना पैसे मिळाले नाहीत. म्हणून त्यांनी एटीएम गाठले मात्र तिथून सुद्धा
त्यांना रिकाम्या हाताने परत व्हावे लागले. त्याबाबत शाखा व्यवस्थापक दिनेश उत्तमराव पाटील त्यांना जाब विचारला असता. त्यांनी अरे रवी चे वर्तन क रून ज्ञानेश्वर आमले यांना लाथा व चापटा बुक्क्यांनी मारहाण केली, शिवीगाळ केली. विशेष हे की या मुजोर व्यवस्थापकाने गावातून लोक आणून तुला जिवंत ठेवणार नाही, असा आमले यांना दम दिला. जवखेडे सिम येथील दुसरे शेतकरी अशोक धोंडू पाटील यांनी निपाणे शाखेतून पैसे काढले असता. त्यांना नकली व खराब नोटा मिळाल्या. ते खराब नोटा परत करण्यासाठी बँक शाखेत गेले असता. त्यांच्याशी सुद्धा शाखा व्यवस्थापक दिनेश पाटील यांनी अरेरावी चे वर्तन केले. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे व अनिल पाटील, संदीप सातपुते, अखिल मुजावर हे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान बँक शाखा व्यवस्थापक दिनेश पाटील यांची या प्रकरणावरून उत्राण शाखेला उचलबांगडी करण्यात आली आहे. असे खात्रीलायक वृत्त आहे. खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना विकास सोसायटी कडून कर्ज मिळते नियमानुसार २५ टक्के कर्जाची रक्कम जिल्हा बँक शाखेचे कडून मिळते. जवखेडे सिम, बामणे, निपाणे या तिन्ही गावांच्या सुमारे ५०० शेतकर्‍यांचे पीक कर्ज निपाणे बँक शाखेकडून वितरित करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेवर उपाध्यक्ष पदाची घुरा सांभाळलेल्या ज्ञानेश्वर आमले यांना पीक कर्जासाठी व्यवस्थापकाच्या मुजोरीला सामना करावा लागला तर सर्वसामान्य शेतकर्‍यांना पिक कर्जाची रक्कम मिळवण्यासाठी किती हाल सोसावे लागत असतील अशी जनमानसात चर्चा होत आहे

Copy