जिल्हा बँक निवडणूकीची प्रारूप मतदार यादी महिनाभरात जाहीर होणार

0

जळगाव: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुक प्रक्रियेला प्रशासकीय पातळीवर आता वेग येत आहे. महिनाभरात जिल्हा बँक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रकाशित केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान बँकेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय प्रमाणे राजकीय पातळीवर देखिल चाचपणी केली जात आहे.

कोरोनामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. मात्र सध्या राज्यात कोरोनाची परिस्थीती आटोक्यात असल्याकारणाने आणि अनलॉकची प्रक्रिया सुरू असल्याने सहकार विभागाच्या प्राधिकरणाने टप्प्याटप्प्याने सहकारी संस्थांच्या निवडणूका घेण्याचा निर्णय घेतला आहे. विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकांचीही प्रक्रिया सहकार विभागातर्फे सुरू आहे. कोरोनाआधी जिल्हा बँक निवडणूकीसाठी ठराव मागविण्यात आले होते. हे ठराव कायम ठेवण्यात आले असुन उर्वरीत सहकारी संस्थांकडूनही ठराव मागविण्यात आले असुन हे ठराव प्राप्त झाल्यानंतर ते पुन्हा विभागीय सहनिबंधकांकडे पाठविण्यात येणार आहे.

जिल्हा बँकेत खडसेंचे वर्चस्व
सध्या जिल्हा बँकेत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे वर्चस्व आहे. त्यांच्या कन्या अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर ह्या विद्यमान अध्यक्षा आहेत. 2014 मध्ये जिल्हा बँक निवडणुकीसाठी खडसे यांनी सर्वपक्षिय पॅनल तयार केले होते. यंदा मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलली आहे. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनीही जिल्हा बँक लढविण्याची इच्छा दर्शविली आहे. जिल्हा बँकेत भाजपाचे 11, राष्ट्रवादी 5, शिवसेना 4 आणि काँग्रेसचे एक असे एकुण 21 संचालक आहेत. आता खडसेच राष्ट्रवादीत आल्याने जिल्हा बँकेत राजकीय समीकरण कसे बदलते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्रशासकीय पातळीवर प्रक्रियेला वेग
जिल्हा बँक निवडणुकीसाठी आत्तापर्यंत 533 विकासोचे ठराव आले इतरांचे 781 ठराव असे एकूण 1314 ठराव जिल्हा सहकार विभागाकडे प्राप्त झाले आहेत. उर्वरीत संस्थांचेही ठराव मागविण्यात आले असुन महिनाभरात जिल्हा बँक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर होणार असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली. जिल्हा बँक निवडणूक ही प्रतिष्ठेची मानली जाते. जिल्ह्यातील राजकारण याच निवडणूकीभोवती फिरते राहिले आहे. त्यामुळे ही सहकारी संस्था ताब्यात घेण्यासाठी आता भाजपा विरूध्द शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असा सामना बघायला मिळणार आहे.

Copy