Private Advt

जिल्हा बँक निवडणुकीसाठी काँग्रेस स्वतंत्र पॅनल देणार

काँग्रेसच्या बैठकीत निर्णय ; जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील यांची माहिती

जळगाव – जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निवडणुकीसाठी काँग्रेसचे स्वतंत्र पॅनल रिंगणात राहणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
राज्य शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुक प्रक्रियेला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ जागांसाठी ऑक्टोबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. मावळत्या संचालक मंडळात सर्वपक्षिय पॅनलच्या सदस्यांचा समावेश आहे. गत निवडणुकीप्रमाणे यंदाही सर्वपक्षिय पॅनल करून निवडणूक बिनविरोध करण्याच्या राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपाच्या हालचाली सुरू आहे. या सर्व प्रक्रियेत काँग्रेसला गृहीतच धरण्यात आले नव्हते. त्यामुळे काँग्रेस या निवडणूकीपासून अनभिज्ञ आहे की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र जिल्हा काँग्रेसनेही जिल्हा बँकेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
बैठकीत स्वतंत्र पॅनलचा निर्णय
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची काँग्रेस भवनात बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी मार्गदर्शन केले. बैठकीनंतर आयोजीत पत्रकार परिषदेत माहिती देतांना जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील यांनी सांगितले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी आगामी सर्व निवडणूका स्वबळावर लढविण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात काँग्रेसच्या विचारसरणीला मानणार मोठा वर्ग आहे. सहकाराचा पायाच काँग्रेसने रचला असल्याने यंदाच्या जिल्हा बँक निवडणुकीत काँग्रेस पक्ष स्वतंत्र पॅनल उभे करणार असल्याचे अ‍ॅड. संदीप पाटील यांनी सांगितले. जिल्हा बँकेच्या १५ सोसायटी आणि ६ इतर अशा एकुण २१ जागांसाठी उमेदवारांची चाचपणी करण्यात आली आहे. सोसायटीसह इतर सहा मतदारसंघासाठी आमच्याकडे तोडीसतोड उमेदवार असल्याचे अ‍ॅड. संदीप पाटील यांनी सांगितले.