जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गटात घरकूल मंजूरीत भ्रष्टाचार

0

साक्री । संपूर्ण जिल्ह्याच्या नागरी समस्या सोडविण्याचे महत्वाचे केंद्र असलेल्या व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर दुसर्‍यांदा विराजमान असलेल्या, तसेच साक्री तालुक्यातील राजकारणावर अत्यंत प्रभावी व्यक्तीमत्व म्हणून ज्यांचा लौकिक आहे, अशा शिवाजीराव दहिते यांच्याच पिंपळगाव बु॥ या जि.प. गटात समस्यांचा सुकाळ झाला असून घरकुल मंजुरीबाबत येथील नागरिकांनी तत्कालीन सरपंच व तत्कालीन ग्रामविकास अधिकार्‍यासह आठ जणांवर अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. अपहारात सहभागी असलेल्या सर्व आरोपींवर कायदेशीर कारवाई करावी, लाभार्थ्यांना शासन नियमानुसार घरकुलांचा लाभ मिळावा, या आरोपींनी लाभार्थ्यांकडून घरकुल मंजूरीसाठी घेतलेले लाखो रुपये व्याजासकट परत मिळावे व पिंपळगाव परिसरातील गावांमधील पाणी टंचाईसारख्या इतर नागरी समस्यांचे त्वरित निवारण व्हावे, आदी मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून प्रारंभ झालेले पिंपळगाव बु॥ ग्रामस्थांचे उपोषण साक्री पंचायत समितीसमोर आजतागायत सुरुच आहे.

लाभार्थ्यांकडून पैशांची केली बेगमी
जि.प. अध्यक्ष शिवाजीराव दहिते याच आदिवासी पट्ट्यातीलपिंपळगाव बु॥ गटातून जि.प.वर निवडून गेले आहेत. मात्र, संपूर्ण जिल्ह्याच्या कारभाराचा गाडा हाकतांना त्यांना आपल्या होमग्राऊंडवर लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही, असे विसंगत चित्र आज दिसते आहे. पिंपळगाव बु॥ ग्रामपंचायतीत सन 2015 ते 2017 या कालावधीत इंदिरा आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली तत्कालीन सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यासह 8 लोकांनी लाभार्थ्यांकडून पैसे घेत सुमारे 7 ते 8 लाखांची बेगमी केली होती. मात्र कोणत्याही लाभार्थ्यांना आजतागायत घरकुलांचा लाभ झालेला नाही. पंचायत राज समितीसमोरसुद्धा प्रकरणाची तक्रार करण्यात आली होती. 11 सप्टेंबर रोजी नागरिकांच्यावतीने पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या अपहारात सामिल असणार्‍या सर्व आरोपींना योग्य ते शासन व्हावे, ग्रामस्थांना शासननियमानुसार घरकुलांचा लाभ मिळावा, आरोपींनी लाभार्थ्यांकडून घेतलेले सर्व पैसे व्याजासकट परत करावे, तसेच परिसरातील टेकपाडा, देवळीपाडा, अबुटबारा, शिनपाडा, कुचीविहिर, नवापाडा, करंझटी आदी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवावी, आदी मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरू आहे.