जिल्हाभरात चोर्‍या करणारे संशयीत स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

यावलसह पहूर, एमआयडीसी चोरी केल्याची कबुली : अन्य भुसावळातील चौघा पसार संशयीतांचा कसून शोध

Attal thieves in Bhusawal in Jalgaon crime Branch’s Net जळगाव : जळगाव गुन्हे शाखेने यावलसह पहूर, एमआयडीसी हद्दीत चोर्‍या करणार्‍या भुसावळातील दोघा भामट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत तर भुसावळातील चौघे साथीदार मात्र पसार होण्यात यशस्वी झाले आहेत. संशयीतांनी तीनही तालुक्यात घरफोडीसह दुकान फोडीचे व अ‍ॅल्युमिनियम तार चोरी केल्याची कबुली दिली आहे. शेख शकिल शेख सलीम (पंचशील नगर, भुसावळ) व शेख आसीफ शेख अकबर (मुस्लीम कॉलनी, खडका रोड, भुसावळ) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.

यांनी आवळल्या मुसक्या
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देवढे, सुनील पंडीत दामोदरे, अशरफ शेख निजामोद्दीन, दीपक शांताराम पाटील, लक्ष्मण अरुण पाटील, किशोर ममराज राठोड, रणजीत अशोक जाधव, श्रीकृष्ण खंडेराव देशमुख, विनोद सुभाष पाटील, ईश्वर पंडीत पाटील, मुरलीधर सखाराम बारी आदींच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

गोपनीय माहितीवरून कारवाई
गुन्हे शाखेला शेख शकिल शेख सलीम व शेख आसीफ शेख अकबर यांनी यावल पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी केल्याची माहिती मिळाल्यानंतर दोघांच्या भुसावळातून मुसक्या आवळण्यात आल्या. संशयीतांनी यावलसह पहूर, एमआयडीसी हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली असून त्याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हादेखील दाखल आहे. दरम्यान, या गुन्ह्यांमध्ये साथीदार वसीम अहमद पिंजारी (रा.पंचशील नगर, भुसावळ), चॅम्पीयन श्याम इंगळे (रा.पंचशील नगर, भुसावळ), श्याम सुभाष शिरसाट ऊर्फ अब्दुल गफ्फर (रा.पापा नगर, भुसावळ), आवेश अहमद पिंजारी (रा. पंचशील नगर, भुसावळ) असल्याची कबुली दिली आहे. दरम्यान संशयीत आरोपी शेख शकिल शेख सलीम व शेख आसिफ शेख अकबर यांना यावल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. संशयीतांकडून आणखी काही घरफोडी व दुकान फोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.