जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक उतरले नदीपात्रात

0

जळगाव: अवैध वाहतुकीची सर्रासपणे वाहतुक होत असल्याने, तसेच याबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी सोमवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास खेडी, आव्हाणे, निमखेडी या शिवारांमध्ये गिरणानदीपात्रात जावून पाहणी केली. या पाहणीत अवैध वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांचे चोरटे मार्ग, कोणकोणत्या ठिकाणांहून वाळूचा उपसा कसा व कोणत्या पध्दतीने केला जातो याबाबतही जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांकडून माहिती जाणून घेण्यात आले. दरम्यान अचानकच्या या पाहणीने एकच खळबळ उडाली असून मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.

जिल्हाधिकार्‍यांकडे अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारी
जिल्हाभरातील वाळू गटांचा लिलाव झालेला नाही. असे असतांनाही मोठ्या प्रमाणावर तसेच सर्रासपणे अवैधपणे वाळु वाहतूक करण्यात येत आहे. नुकतीच दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी नाकाबंदी करण्यात येवून तपासणी करण्यात आली. यात रात्रीच्या वेळी वाळूची वाहनांवर कारवाई करण्यात येवून संबंधितांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. अवैध वाळू वाहतुकीवर कायमचा आळा बसावा, व महसूलात वाढ व्हावी, असे आदेशही नुकतेच विभागीय आयुक्तांकडून जिल्हाप्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच अवैध वाळू वाहुकीबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे काही तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या.

Copy