जिंदगी तो बेवफा है!

0

मृत्यू हे जीवनातील अंतिम सत्य आहे. प्रत्येकाला एक ना एक दिवस जायाचेच असते. आयुष्याच्या या रंगमंचावर प्रत्येकजण आपआपली भूमिका निभावत असतो. भूमिका संपली की एक्झिट ठरलेली असते. प्रत्येकजण मरत असतो, परंतु आपणही एक दिवस मरणार आहोत, याबाबत सर्वचजण बेफिकिर असतात. बॉलीवूडमधील अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनाने मृत्यूचा नवा अर्थ प्रत्येकाला कळला असेल. वयाच्या 70 व्या वर्षी कर्करोगाने या गुणी अभिनेत्याची प्राणज्योत मालवली. काही दिवसांपूर्वी खंगलेले, थकलेले आणि विपन्नावस्थेतील विनोद खन्ना सर्वांनी सोशल मीडियावरील एका व्हायरल छायाचित्राद्वारे पाहिले होते. अनेकांचा तेव्हा त्या छायाचित्रावर विश्‍वास बसला नव्हता. परंतु, ते छायाचित्र, त्यातील वस्तुस्थिती सत्य होती. तेव्हाच विनोद खन्ना हे फार दिवसांचे सोबती नाहीत, हे प्रत्येकाच्या लक्षात आले होते. मुकद्दर का सिकंदर या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची जी एक्झिट दाखवली होती, तशीच काहीशी एक्झिट विनोद खन्नांनी घेतली आहे. ती प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेली आहे. मृत्यू सत्य असला तरी एखाद्या लोकप्रिय अभिनेत्याला अशाप्रकारे त्याला सामोेरे जावे लागेल, असे कुणालाही वाटले नाही.

‘जिंदगी बेवफा है‘ असे रुदनगीत विनोद खन्ना त्या एक्झिटदृश्यात गाताना दिसतात. आज जेव्हा त्यांनी स्वतःला मृत्यूच्या हवाली केले तेव्हा त्यांच्याही मनात असेच काहीसे भाव असतील. 70, 80 आणि 90च्या दशकांचा काळ त्यांनी गाजविला. लाखो तरुण-तरुणींच्या हृदयावर त्यांनी राज्य केले. आपल्या देखण्या चेहर्‍याने अन् दमदार अभिनयाने ते रसिकांच्या गळ्यातील ताईत झालेत. विनोद खन्नांना चित्रपटात घेतले की पिक्चर हिट अशी काहीशी भावना निर्मात्यांची झाली होती. समकालिन अभिनेत्यांना मागे टाकून त्यांनी हे यश संपादन केले. ते ज्या क्षेत्रात गेले त्या क्षेत्रातही अव्वल ठरले. अभिनय, राजकारण, अध्यात्म अशा क्षेत्रात त्यांनी मुशाफिरी केली. परंतु, त्यांचे वैयक्तिक जीवन मात्र एखाद्या चित्रपटाची कथा ठरावी, असेच राहिले. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले विनोद अभिनेता होण्यापासून ते ओशो रजनीश यांच्याकडून प्रभावित होऊन वैवाहिक आयुष्य संपुष्टात आणण्यापर्यंत चर्चेत राहिले. ओशोंच्या चरणी त्यांनी आयुष्यातील पाच वर्षे खर्ची घातली. त्यात त्यांचे वैवाहिक, राजकीय आणि अभिनयक्षेत्रातील जीवन संपुष्टात आले. ‘सेक्सी संन्यासी‘ हे त्यांना ओशोजवळ लागलेले बिरूद अनेकांना धक्कादायक असेच होते. पारतंत्र्याच्या काळात त्यांचा जन्म पेशावरमध्ये झाला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर त्यांचे कुटुंब भारतात आले. वडिल व्यावसायिक होते. त्यामुळे मुलानेही आपल्याप्रमाणेच व्यवसाय करावा, असा त्यांचा आग्रह होता. परंतु, महाविद्यालयीन जीवनात त्यांना अभिनयाचे वेड लागले अन् वडिलांनी बंदूक रोखून, जीवे मारण्याची धमकीही देऊनही त्यांनी त्याचक्षेत्रात पाऊल टाकले. या क्षेत्रात ते पुढे गाजले, लोकप्रिय ठरले अन् लोकप्रियतेची नानाविध शिखरे त्यांनी गाठलीत. चित्रपट क्षेत्रातील त्यांचा वावर, सहअभिनेत्रींशी त्यांचा व्यवहार या सर्वच बाबींची चर्चा झाली. कधी ती चांगली तर कधी ती वाईट होती. हिंदी चित्रपटांत खरे तर त्यांनी खलनायकाच्या भूमिकेपासून कारकीर्द सुरु केली होती. परंतु, देखणा चेहरा, रुबाबदार व्यक्तिमत्व यामुळे ते नायक म्हणून पुढे आले. मेरे अपने, कुर्बानी, पुरब और पश्‍चिम, रेशमा और शेरा, मेरा गाव मेरा देश, दी बर्निंग ट्रेन, कुदरत, इम्तिहान, हाथ की सफाई, हेराफेरी, मुकद्दर का सिकंदर, अमर अकबर अ‍ॅन्थोनी यासारख्या चित्रपटांनी त्यांना नावलौकिक मिळवून दिला. दयावान या चित्रपटाने तर त्यांच्या लोकप्रियतेवर कळस चढविला होता.

1968 ते 2013 या काळात त्यांनी तब्बल 141 चित्रपटांत काम केले. ओशोंच्या सहवासात आल्यानंतर 1997 मध्ये त्यांनी चित्रपटांतून संन्यास घेण्याची भूमिका व्यक्त केली अन् सर्वांना धक्का बसला. याच काळात त्यांनी राजकारणातदेखील पाऊल ठेवले. भारतीय जनता पक्षाचे सदस्य बनल्यानंतर ते राजकीय नेते झाले. त्यांची तीही भूमिका लोकांना आवडली. पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून सलग चारवेळा ते खासदार झाले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सत्ताकाळात ते केंद्रात सांस्कृतिक व पर्यटनमंत्रीही होते. भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत त्यांचे स्थान अव्वल होते. आयुष्यातील यशाचा आलेख असा चढता असतानाच, काही वर्षांपूर्वी त्यांना कर्करोगाने गाठले. वयाच्या 70 व्यावर्षी तर या रोगाने त्यांचे शरीर गिळून घेतले. काही दिवसांपूर्वीच त्यांचे खंगलेल्या अवस्थेतील छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले अन् काहीक्षण प्रत्येकाला ते फोटोशॉपवर केलेली किमया वाटली. परंतु, त्यांची ती अवस्था सत्य होती. मुंबईतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते अन् शेवटच्याक्षणी आपले म्हणावे, असे कुणी त्यांच्याजवळ नव्हते. मन आणि शरीराची ती अवस्था एका रुबाबदार व्यक्तिमत्वाच्या नायकासाठी निश्‍चितच क्लेशदायक अशी होती. चित्रपटाचा पडदा, राजकारण आणि अध्यात्म अशी क्षेत्रे गाजविणार्‍या या अभिनेत्याला मृत्युसमोर मात्र घुटणे टेकवावे लागले. कर्करोगाचा विळखा, वयाच्या सत्तरीतील शरीर साथ देत नाही अन् डोळ्यासमोर दिसणारा मृत्यू, दोन कुटुंबे असतानाही आपल्यांनीच सोडलेली साथ अशा विपन्न अवस्थेत त्यांची अखेरची संध्याकाळ गेली. जिंदगी बेवफा है.. असे ते म्हणत असतानाच मृत्यूने त्यांच्यावर झडप घातली. मृत्यू ही आनंदयात्राच असते. भावनिक कल्लोळ, शारीरिक यातना यांच्यातून विनोद खन्ना यांची मृत्यूने सुटका केली आहे. त्यांच्या निधनाने बॉलीवूडवर शोककळा पसरणे सहाजिक आहे. परंतु, त्यांच्या असंख्य चाहत्यांना या लाडक्या अभिनेत्याची अशी एक्झिट मनाला चटका लावून देणारी ठरली आहे.