Private Advt

जालना जिल्ह्यात भीषण अपघात : एरंडोलचे तिघे ठार

भुसावळ/एरंडोल : भरधाव ट्रकने छोटा हत्ती वाहनाला जोरदार धडक दिल्याने एरंडोल शहरातील जावयासह सासूसह तिघे ठार झाले तर अन्य दोघे जखमी झाले. हा अपघात जालना जिल्ह्यातील भोकरदन-राजूर रस्त्यावरील बाणेगाव पाटीवर बुधवार, 27 रोजी सकाळी साडेसहा वाजता घडला. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला आहे. रामदास रतन पाटील (40), कल्पनाबाई भरत पाटील (47) व कल्पना गोविंदा ठाकूर (45, सर्व रा.अमळनेर दरवाजा परीसर, एरंडोल) अशी मयतांची नावे आहेत. अपघाताने एरंडोल शहरावर शोककळा पसरली आहे.

पहाटेच्या सुमारास अपघात
एरंडोल शहरातील कुरडया-पापड विक्रेते साहित्य विक्रीसाठी जालना शहराकडे मंगळवार, 26 रोजी रात्रीच छोटा हत्ती (एम.एच.19 सी.वाय.1091) निघाले होते व मध्यरात्री जालना शहराच्या अलिकडे त्यांनी मुक्काम केल्यानंतर भल्या पहाटेच ते जालना शहराकडे निघाले असताना बाणेगावजवळ समोरून भरधाव वेगाने येणारा ट्रक (एम.एच.40 ए.के.5156) ने जबर धडक दिल्याने टाटा एस वाहनातील कल्पनाबाई पाटील व रामदास पाटील या सासुसह जावयाचा जागीच मृत्यू झाला तर कल्पना ठाकूर यांना जालना येथे उपचारार्थ हलवण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला तर सचिन सुखलाल पाटील (40) व भारत पाटील (55) जखमी झाले असून जालना येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर चालक पसार : एरंडोलमध्ये शोककळा
अपघात घडल्यानंतर ट्रक चालक वाहन सोडून पसार झाला तर ट्रकच्या जबर धडकेने छोटा हत्ती वाहनातील साहित्य तसेच कुरडया-पापड विखुरले होते. घटनास्थळी राजुर पोलीस चौकीचे गणेश मांटे, सिद्धू साबळे व भोकरदन पोलीस ठाण्याचे कर्मचार्‍यांनी धाव घेत पंचनामा केला. एरंडोल येथे बुधवारी सकाळी अपघाताचे वृत्त धडकताच अमळनेर दरवाजा परीसरात शोककळा पसरली आहे.