Private Advt

जामनेर पोलिसांनी पावणेतीन लाखांचा गुटखा केला जप्त : आरोपी पसार

जामनेर : जामनेर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून सुमारे पावणेतीन लाखांचा गुटखा जप्त केला मात्र अंधाराचा फायदा घेवून संशयीत पसार झाला. दोन लाख 63 हजार 300 रुपयांचा गुटखा तसेच चार लाख रुपये किंमतीची मारोती इको गाडी जप्त करून चालक व मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जामनेर तालुक्यातील करमाड येथील पाराचा चौक परीसरात (एम.एच.19 सीझेड 5768) या वाहनांमध्ये बेकायदेशीररित्या तंबाखू व पानमसालाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना मिळाल्याने त्यांनी संबंधित गावात 7 रोजी मध्यरात्री सापळा रचला. मध्यरात्री दोन वाजता वाहन येताच पथकाने वाहन अडवले मात्र त्याचवेळी लोडशेडींग सुरू असल्याने अंधाराचा फायदा घेत चालक पसार झाला. पोलिसांनी गुटखा जप्त करीत वाहन पोलिस ठाण्यात आणले व चालकासह मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल निलेश घुगे यांच्या फिर्यादीवरून वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किरण शिंदे करीत आहे.