जामनेर पोलिसांनी उधळला दरोड्याचा कट : पाच दरोडेखोर जाळ्यात

0

गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतुस व दरोड्याचे साहित्य जप्त

भुसावळ- जामनेर तालुक्यातील नेरी ते पहुर रोडवर खोडपे पेट्रोल पंपाजवळ दरोडेखोर दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती जामनेर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून पाच जणांना अटक केली. त्यातील एक संशयीत अल्पवयीन आहे. 23 रोजी रात्री नऊ वाजता ही कारवाई करण्यात आली. अटकेतील आरोपींकडून तीन दुचाकींसह एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुस, चॉपरसह दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले. अटकेतील आरोपींमध्ये जळगावातील तीन तर जामनेर तालुक्यातील दोघांचा समावेश आहे. आरोपींच्या अटकेमुळे अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

गुप्त माहितीनुसार पाच दरोडेखोरांना अटक
जामनेर पोलिसांना तीन मोटारसायकलीद्वार चार ते पाच जण दरोडा टाकण्याच्या उद्देशाने थांबले असल्याची माहिती 23 रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मिळाल्यानंतर त्यांनी नेरी ते पहुर रोडवर खोडपे पेट्रोल पंपाजवळ सापळा रचला. पोलिस आल्याची कुणकुण लागताच शेतातून आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना अटक करण्यात आली. अटकेतील आरोपींमध्ये अमोल गोकुळ पाटील (25, मोहाडी, ता.जामनेर), सलमान अहमद खान (21, तांबापुरा, जुमाशा वखार, जि.जळगाव), सैय्यद सलमान सैय्यद कासीम (24, महादेव मंदिराजवळ, तांबापुरा, जि.जळगाव), आरीफ जहांगीर देशमुख (21, रामनगर, जळगाव) व हिंगणे बु.॥, ता.जामनेर येथील एका 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. आरोपींविरुद्ध सचिन संतोष पाटील यांच्या फिर्यादीनुसार जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

तीन दुचाकींसह दरोड्याचे साहित्य जप्त
आरोपींच्या ताब्यातून 15 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा, एक हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतुसे, दुचाकी (क्रमांक जी.जे.19 ए.एन.4958), यामाहा विना क्रमांकाची दुचाकी तसेच दुचाकी (एम.एच.19 सी.एम.4085) , चॉपर, स्क्रू ड्रायव्हर, स्कूल सॅग, ग्लोज तसेच आठ मोबाईल मिळून एक लाख 23 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेरचे पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील, सचिन चौधरी, विनोद पाटील, तुषार पाटील, मनोज धनगर, सचिन पाटील आदींच्या पथकाने केली.

Copy