जामनेरात साडेअकरा लाखांचा दरोडा : भुसावळातील आरोपी जाळ्यात

0

भुसावळ बाजारपेठ पोलिसांची गोपनीय माहितीवरून कारवाई : आरोपी जामनेर पोलिसांच्या ताब्यात

भुसावळ : जामनेर शहरातील गिरीजा कॉलनीत राहणार्‍या वृद्ध दाम्पत्याला दोराने बांधून तिघा चोरट्यांनी घरातील रोकडसह सोने मिळून सुमारे साडेअकरा लाखांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना 8 मे 2020 रोजी घडली होती. तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाल्याने त्यांचा शोध सुरू असताना एक चोरटा भुसावळातील वाल्मीक नगरात असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना कळाल्यानंतर त्यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. जितेंद्र ऊर्फ (जितु) किसन गोडले (27, रा.जामनेर रोड, वाल्मीक नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

वयोवृद्धांना बांधून चोरट्यांची घरफोडी
जामनेरातील गिरीजा कॉलनीत बळीराम जयराम माळी (75) हे पत्नीसह राहतात. शुक्रवार, 8 मे रोजी पहाटे तीन ते चार वाजेच्या सुमारास चोरट्यांनी माळी यांच्या गळ्याला दोर बांधत पैशांची पेटी कुठे आहे ? असे विचारत पैसे व सोने असलेली पेटी लांबवली होती व नंतर ही पेटी कांग पदीपात्रात फेकलेल्या अवस्थेत आढळली होती. पोलिस चौकशीत तब्बल 11 लाख 44 हजार 562 रुपयांची घरफोडी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जामनेर पोलिसात भाग 5, गु.र.न 142/2020 भादंवि 380, 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भुसावळातून चोरट्याला अटक
जामनेरातील घरफोडीतील आरोपी भुसावळच्या टिंबर मार्केट परीसरात आल्याची माहिती बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक रवींद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, महेश चौधरी कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी आदींनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपीला गुरुवारी जामनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक धरमसिंग वि.सुंदरडे व कॉन्स्टेबल अमोल घुगे यांच्या ताब्यात देण्यात आले.

आरोपी कुविख्यात
अटकेतील आरोपी जितेंद्र ऊर्फ (जितु) किसन गोडले हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ, भुसावळ लोहमार्ग, सावदा, जामनेर पोलिसात मुद्देमाल लूट व शरीराविरुद्ध गुन्हे दाखल असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

Copy