जामनेरात पतसंस्था कर्मचार्‍याची गळफास

0

जामनेर । पतसंस्था कर्मचारी रमेश पवार वय 43 यांनी पतसंस्थेच्या वरील हॉलला लागून असलेल्या खोलीतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा माहिती मिळताचा परीसरात एकच खळबळ उडाली असून जामनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. घटनेनंतर अनेकांनी जामनेर उपजिल्हा रूग्णालयात धाव घेऊन गर्दी केली.

येथील महालक्ष्मी पतसंस्थेत रमेश पवार हे कारकून म्हणून असून आज 9 जानेवारी रोजी सकाळी पवार हे पतसंस्था सुरू होईपर्यंतही आले नाहीत. त्यामुळे व्यवस्थापक किशोर झांबरे यांनी पवार यांना मोबाईलवर दोनवेळा फोन केला. मात्र पवार यांचेकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. तीन वाजेला व्यवहार बंद झाल्यानंतर व्यवस्थापक झांबरे हे काही कामासाठी जळगावला निघून गेले. तर कर्मचारी देवानंद सोनार हे शौचालयासाठी पतसंस्थेच्या वरील हॉलला लागून असलेल्या रेस्टरूममधील वरच्या मजल्यावर गेले. मात्र रेस्टरूम लॉक असल्याने सोनार यांनी पतसंस्थेतील शिपायास चावीबाबत विचारले असता रमेश पवार हे सकाळी 9 वाजेदरम्यान चावी घेऊन वर गेले होते असे शिपायाने सांगीतले. पवार वरील रेस्टरूममध्ये झोपी गेले असतील असा संशय आल्याने सोनार व शिपाई पुन्हा वर गेले व त्यांनी लॉकच्या छिद्रातून आत पाहिले असता त्यांना पवार लटकेलेल्या अवस्थेत असल्याचे दिसले. सोनार यांनी तात्काळ व्यवस्थापक झांबरे, व्हाईस चेअरमन अ‍ॅड.शिवाजी सोनार व काही संबंधीतांना हा प्रकार सांगीतला. त्यानंतर दरवाजा तोडून पवार याचा मृतदेह खाली काढून जामनेर उपजिल्हा रूग्णालयात ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी देवानंद सोनार यांनी दिलेल्या माहितीवरून जामनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पवार यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.