जांबुवंतराव धोटे यांच्या पार्थिवावर झाले अंत्यसंस्कार

0

यवतमाळ । विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे यांच्या पार्थिवावर आज पिंपरी-लासीना येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. जांबुवंतराव धोटे यांचे शनिवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने चाहत्यांसह विदर्भावर शोककळा पसरली आहे. जांबुवंतराव धोटे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, सहपालकमंत्री संजय राठोड, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, माजी केंद्रीय मंत्री काँग्रेस नेते मुकूल वासनिक यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. आज त्यांच्या निवासस्थानाहून अंत्ययात्रा काढण्यात आली. वाघाचे चित्र असलेला फॉरवर्ड ब्लॉकचा झेंडा त्यांच्या पार्थिवावर पांघरण्यात आला होता.

राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त

शेर आया शेर, आणि वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, अशा गगनभेदी घोषणा देत भाऊंच्या समर्थकांनी आसमंत निनादून सोडला होता. शहरातील विविध मार्गावरुन मार्गक्रमण करीत ही अंत्ययात्रा अमरावती मार्गावरील पिंपरी-लासीना येथील त्यांच्या शेतात पोहोचली. त्या ठिकाणी जंबुवंतरावांचे पार्थिव दफन करण्यात आले. भाऊ जांबुवंतराव धोटे यांच्या निधनाचे वृत्त कळताच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शोक व्यक्त केला.