जवान शहीद होऊ लागले, तर भारत शांत बसणार नाही

0

नवी दिल्ली । भारताशी पंगा घेणे आता पाकिस्तानला चांगलेच महागात पडणार आहे. कारण भारतीय सैनिक आणि नागरिकांवर आणखी हल्ले झाले, तर भारत शांत बसणार नाही, असा इशारा अमेरिकेतील एका सिनेटरने पाकला दिला आहे. डेमॉक्रेटिक पक्षाचे गटनेते जो क्राऊली यांनी ‘पीटीआय’शी बोलताना यासंदर्भात वक्तव्य केले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून दहशतवाद्यांच्या सुरू असलेल्या कारवायांमुळे सध्या भारत-पाकिस्तान सीमेवरील वातावरण तणावपूर्ण आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानवर दबाव आणला पाहिजे, अशी मागणी क्राऊली यांनी केली. पाक हिंसक आणि कट्टरतावादी दहशतवादी संघटनांना आवर घालण्याची गरज आहे अन्यथा भारत त्यांच्या सैनिक आणि नागरिकांवर हल्ले होत राहिल्यास शांत बसणार नाही, असे क्राऊली यांनी म्हटले. या सगळ्या वादावर द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याची गरज आहे. या सगळ्यात अमेरिका दोन्ही देशांचा मित्र म्हणून मध्यस्थी करू शकते. या परिसरात शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेकडून दोन्ही देशांवर दबाव आणला जाऊ शकतो, असेही क्राऊली यांनी सांगितले.