Private Advt

जळगाव सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील लाचखोर शिपाई एसीबीच्या जाळ्यात

भुसावळ : जळगावच्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील शिपायास 30 हजारांची लाच घेताना जळगाव एसीबीच्या पथकाने कार्यालयातच रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास हा सापळा यशस्वी करण्यात आला. गोपाळ चौधरी असे अटकेती लाचखोर शिपायाचे नाव आहे.

कार्यालयातच सापळा रचून केली अटक
जळगाव जिल्ह्यातील एका तक्रारदाराने जळगाव सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात सिक्युरीटी गार्डच्या नोकरीसाठी अर्ज दिला होता. या कार्यालयातील गोपाळ चौधरी नामक शिपायाने आपले कार्यालयातील वरीष्ठांशी घनिष्ठ संबंध असल्याचे सांगून विश्वास संपादन करीत दोन लाख 10 हजारांची मागणी केली होती व पहिल्या टप्प्यात सोमवारी 30 हजार रुपये देण्याचे सांगितल्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. जळगाव कार्यालयात एसीबीच्या पथकाने सापळा रचला. 30 हजारांची लाच शिपायाने स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणात आता वरीष्ठांच्यादेखील अडचणी वाढल्या असून आरोपीने कुणाच्या सांगण्यावरून लाच मागितली याचीदेखील आता चौकशी होणार आहे.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा एसीबीचे नाशिक पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, वाचक पोलिस उपअधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत एस.पाटील, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव व पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, हवालदार शैला धनगर, नाईक मनोज जोशी, नाईक सुनील शिरसाठ, पोलिस नाईक जनार्धन चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने यशस्वी केला.