जळगाव शहराला अत्याधुनिक जलशुद्धीकरण यंत्रणा, वॉटर मीटर देण्यासाठी प्रस्ताव!

0

महापौरांनी घेतली सविस्तर माहिती : मनपाचा होणार करोडोंचा फायदा

जळगाव: शहराला पाणी पुरवठा करणारी यंत्रणा फार जुनी झाली असून यंत्रणा दुरुस्ती, पाणी खरेदी, शुद्धीकरण आणि विद्युत बिलापोटी साधारणता प्रति हजार लिटर पाण्याची 16 रुपये खर्च येतो. जळगावात नवीन जलशुद्धीकरण यंत्रणा मोफत बसवून देत 11 रुपये दराने पाणी देण्यासाठी एका कंपनीने प्रस्ताव दिला असून महापौर भारती सोनवणे यांनी शुक्रवारी याबाबत सविस्तर माहिती घेतली. एआयबीसीसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने दिलेला प्रस्ताव अंमलात आणल्यास शहरात वॉटर मीटर देखील बसविले जाणार असून मनपाला वर्षाकाठी करोडोंचा फायदा होणार असल्याची माहिती महापौरांनी दिली आहे. जळगाव शहराला स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा यासाठी ऑगस्ट महिन्यात एआयबीसीसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने एक प्रस्ताव मनपाला दिला होता. युरोप, उत्तर मध्य भागासह जगभरातील तंत्रज्ञानचा 3 वर्ष अभ्यास केल्यानंतर एआयबीसीसीने काही कंपन्यांशी करार केला असून भारतातील नागरिकांच्या आरोग्य सुधारणेसाठी ते त्यांचे तंत्रज्ञान देण्यासाठी त्यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. शुक्रवारी महापौरांनी याबाबत सविस्तर माहिती घेतली. एआयबीसीसी कंपनीचे संस्थपक राजदील जमादार, जलतज्ञ मनोज यादव, प्रमोद भरबुडे यांनी
माहिती दिली.

जलशुद्धीकरण यंत्रणा होणार आधुनिक
जळगाव मनपाला दिलेल्या प्रस्तावानुसार ते स्वखर्चाने जळगाव शहर मनपाच्या जलशुद्धीकरण यंत्रणेचे नूतनीकरण करणार आहे. कंपनीने केलेल्या अभ्यासानुसार जळगाव शहरासह इतर नपाच्या हद्दीतील पाण्याचा दर्जा सर्वोत्तम नाही. गेल्या 20 वर्षापासून औद्योगिकीकरण, शहरीकरणमुळे ते पाणी नदीत सोडण्यात आल्याने खान्देशातील पाणी दूषित झाले आहे. तसेच जळगावची यंत्रणा देखील 50 वर्षापूर्वीची आहे. एआयबीसीसी संपूर्ण यंत्रणा आधुनिक होणार असून मनपाचा अतिरिक्त खर्च वाचणार आहे.

जळगावकरांना पाणी देण्यासाठी सध्या प्रति हजार लिटरसाठी 16 रुपये खर्च होत असून गेल्या तीन वर्षातील संचित तोटा 28 कोटी आहे. एआयबीसीसीच्या प्रस्तावानुसार ते संपूर्ण अत्याधुनिक यंत्रणा बसवून देणार असून मनपाला 1000 लीटर पाणी 11 रुपये दराने मिळणार आहे. शहराला एका वेळी 100 एमएलडी पाणी लागते. त्यानुसार एका वेळेस मनपाचे 5 लाख रुपये वाचणार आहे. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी माहिती घेतली असता एआयबीसीसी कंपनी देत असलेल्या 11 रुपयांच्या खर्चात लाईटबील, पाणी खरेदीचा खर्च देखील समाविष्ट करणार आहे.

वॉटर मीटर बसविणार, मनपाला यंत्रणा हस्तांतरित करणार
नवीन अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यास साधारणता 200 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तसेच वॉटर मीटरचा अतिरिक्त खर्च लागणार आहे. एआयबीसीसी यंत्रणा हाताळणीसाठी मनपाच्या कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देणार असून सुरुवातीला 3 वर्ष हाताळणार आहे. त्यानंतर ते यंत्रणा मनपा कर्मचार्‍यांना हस्तांतरित करणार असून ते कायम तांत्रिक सल्ला देणार आहे. मीटर बसविल्याने नागरिक जेवढे पाणी वापरणार तेवढेच बील येणार आहे.

प्रकल्पातून मनपाला अनेक फायदे
एआयबीसीसीच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यास ते जळगाव मनपाची पेमेंट सिस्टीम देखील सुधारणार आहेत. सर्व भरणा यंत्रणा ऑनलाईन करून पेमेंट मनपाच्या खात्यात जमा होईल अशी व्यवस्था करून देणार आहेत.

Copy