जळगाव महापालिकेत भाजपाला शिवसेनेचा पुन्हा धक्का

भाजपा ३ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

जळगाव – शहर महापालिकेत भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा शिवसेनेने धक्का दिला आहे. भाजपाच्या ३ नगरसेवकांनी पक्षांतर करून आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांना हा दुसरा धक्का मानला जात आहे.
जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना शिवसेनेत घेण्याचा सपाटा सुरूच आहे. महापालिकेत भाजपाचे २४ नगरसेवक फोडुन शिवसेनेने महापालिकेवर सत्ता स्थापन केली. यानंतर मुक्ताईनगरातील कागदोपत्री भाजपाचे असलेल्या नगरसेवकांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. आता पुन्हा जळगाव शहर महापालिकेतील भाजपाच्या ३ नगरसेवकांनी आज मुंबई येथे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधुन शिवसेनेत प्रवेश केला. यात सुरेश सोनवणे, शोभा बारी, शेख हसिना शेख शरीफ या नगरसेवकांचा समावेश आहे. यावेळी शिवसेनेचे सचिव विनायक राऊत, जळगाव लोकसभेचे संपर्क प्रमुख डॉ. संजय सावंत, विलास पारकर, मोहन म्हसळकर, उपमहापौर कुलभूषण पाटील उपस्थित होते.