जळगाव-मनमाड दरम्यान तिसर्‍या रेल्वे लाईनच्या कामाला सुरुवात

0

मुख्य अभियंत्यांंनी केली कामाची पाहाणी

भुसावळ- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील तिसर्‍या रेल्वे लाइनच्या कामाला मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर जळगाव- मनमाड मार्गावरील तिसर्‍या लाईनच्या कामाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात जळगाव ते शिरसोलीपर्यंतचे काम सुरू असून 11.5 किमी अंतरात तीन मोठे व 19 लहान पूल आहेत. त्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने पहिल्या टप्प्यात तीन मोठ्या पुलांचे काम हाती घेतले असून दोन पुलांचे काम पूर्ण झाले आहे. तिसर्‍या मोठ्या पुलाचे काम झाल्यानंतर लहान पुलांची उभारणी केली जाईल.

मुख्य अभियंत्यांकडून पाहणी
भुसावळ-जळगाव, जळगाव-शिरसोली या मार्गावरील तिसर्‍या लाइनच्या कामाची बुधवारी मुंबई येथील मुख्य अभियंता दिनेश कटारिया यांनी पाहणी केली. भुसावळ रेल्वे यार्डात जोडल्या जाणार्‍या तिसर्‍या लाईनपासून ते भुसावळ-भादली, भादली-जळगाव आणि जळगाव ते शिरसोली मार्गावरील कामांची त्यांनी पाहाणी केली. मुख्य अभियंता रोहित थवरे त्यांच्यासोबत होते.

मार्गादरम्यान 304 मोठे, 22 लहान पूल
जळगाव-मनमाड 160 किमी अंतराच्या रेल्वेमार्गावर 304 लहान पूल व 22 मोठे पूल आहेत. टप्प्याटप्प्याने या पुलांची निर्मिती केली जाणार आहे. या अंतरात 20 रेल्वेस्थानके येतात. ही सर्व स्थानके तिसर्‍या लाइनला जोडली जाणार आहेत. 2022 पर्यंत जळगाव-मनमाड तिसरी लाईन पूर्ण करण्याचे उद्दीष्ट रेल्वे बोर्डाने दिले आहे.

Copy