Private Advt

जळगाव जिल्ह्यावर अवकाळी पावसाचे संकट !

शेतकर्‍यांसह नागरीकांनी सुरक्षित स्थळी रहावे : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन

जळगाव : अरबी समुद्रात लक्षद्वीपमध्ये येत्या 24 तासांत कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता व बर्‍हाणपूर (मध्यप्रदेश) क्षेत्रात भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे तसेच 2 डिसेंबर 2021 पर्यंत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरीक, शेतकर्‍यांनी सतर्क राहात सुरक्षितस्थळी थांबावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

शेतकर्‍यांसह नागरीकांना सतर्कतेचे आवाहन
जळगाव जिल्ह्यातील अवकाळी पाऊस व तापी नदीमधील पाण्याच्या पातळीत वाढ होवून हातनूर धरणाच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील शेतकरी व नदी काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे. शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल, तर अशा शेतमालाचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. अवकाळी पावसादरम्यान विजा, गारा व अतिवृष्टीपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. प्रसंगी मोकळे मैदान, झाडाखाली, वीजवाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मर जवळ थांबू नये, असेही आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.