Private Advt

जळगाव जिल्ह्यात एमआयएमला झटका : प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांचा ‘प्रहार’मध्ये प्रवेश

भुसावळातील सत्ताधार्‍यांना जनता कंटाळली ; पालिकेवर आता प्रहारचा झेंडा फडकणार : अनिल चौधरी

भुसावळ : पक्षाच्या ध्येयधोरणाला कंटाळून राजीनामे दिलेल्या ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात ‘एआयएमआयएम’ पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्यासह पक्ष नेतृत्वावर विश्‍वास ठेवून प्रहार पक्षात प्रवेश केला. एमआयएमचे उत्तर महाराष्ट्र सचिव फिरोज शेख, रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष अशरफ तडवी, माजी युवक जिल्हाध्यक्ष नावीद खान, जिल्हा सहसचिव महेमूद पठाण, कलीम शेख, माजी भुसावळ युवक शहराध्यक्ष एलियाज पटेल, भुसावळ उपतालुकाध्यक्ष अफजल खान, युवा तालुकाध्यक्ष नदीम शेख, रावेर लोकसभा सचिव वसीम शेख यांनी राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीत प्रहार जनशक्ती पार्टीत जाहीर प्रवेश केला. यावेळी प्रहारचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे उपस्थित होते.

प्रहार पक्षाला मिळणार बळकटी : बच्चू कडू
अल्पसंख्यांक समाजाचे प्रामाणिक व होतकरु पदाधिकारी प्रहार पक्षात प्रवेश करीत असल्याने मंत्री बच्चू कडू यांनी समाधान व्यक्त केले. पदाधिकार्‍यांच्या पक्ष प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाला आणखी बळकटी मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. अन्य पक्षात जुन्या नेत्यांना डावलले जात असून त्यामुळेच जळगाव जिल्ह्यातील एमआयएम पक्षातील पदाधिकारी प्रहार पक्षात प्रवेश करीत असल्याचा आनंद वाटत असल्याचेही ते म्हणाले.

भुसावळ पालिकेवर झेंडा फडकवणार : अनिल चौधरी
भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी म्हणाले की, कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद आणखीन बळकट झाली आहे. आगामी काळात भुसावळसह विभागातील पालिका निवडणुकीमध्ये आम्ही पूर्ण ताकदिनिशी उतरणार असून निश्‍चित प्रहार पक्षाला मोठे यश त्यात मिळणार आहे. भुसावळात सत्ताधार्‍यांच्या कारभाराला जनता कंटाळली असून शहर बकाल झाले असून पालिकेवर आता प्रहारचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

भाजपाकडून विभाजीत शक्तींना उधाण
पुढे बोलताना अनिल चौधरी म्हणाले की, महाराष्ट्रात इतर पक्षाकडे कुठलीही विचारधारा शिल्लक नसल्यामुळे युवा वर्ग यांना कंटाळला आहे. विभाजीत करणार्‍या शक्ती ह्या जगातील कुठल्याही गोष्टींना एकसंघ करू शकत नाही मात्र आज देशात भाजपने ह्याच विभाजित करणार्‍या शक्तींना उधाण दिले आहे.

मुंबईत झाला प्रवेश सोहळा
मुंबई येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या पुढाकाराने जळगाव जिल्ह्यातील एमआयएम संघटनेतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा झाला.