जळगाव जिल्हावासियांनो विषाची परीक्षा का घेत आहात?

0

डॉ.युवराज परदेशी

जळगाव: जगभर धुमाकूळ घालणार्‍या करोना विषाणूमुळे अमेरिकेत हाहाकार उडाला असून इटलीमध्ये मृत्यूचे तांडव सुरु आहे. भारतावरही करोनाचे संकट दिवसेंदिवस दाट होत चालले असून भारतात आतापर्यंत जवळपास एक हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. महाराष्ट्रातही करोना रुग्णांची सातत्याने वाढत असून हा आकडा आता १९३ वर गेला आहे. त्यामुळे सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. केंद्र व राज्यसरकारने लॉकडाऊन घोषित करुन नागरिकांना घरात बसण्याचे आवाहन केले आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत बाहेर विनाकारण फिरणार्‍यांची संख्या कमी होतांना दिसत नाही. यात जळगावकर देखील मागे नाहीत. पुणे, पिंपरी चिंचवड व मुंबईत हातपाय पसरणार्‍या कोरोनाने आता जळगाव शहरात देखील शिरकाव केला आहे. शहरातील मेहरूण भागात राहणार्‍या एका ४९ वर्षीय रुग्णाचा करोना तपासणीचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षकांसह अनेक लोकप्रतिनिधी नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करत आहेत. मात्र ‘हा कोरोना आमचं काय करुन घेईल’ अशा आविर्भावात तोंडावर रुमाल बांधून रस्त्यावर दुचाकींनी विनाकारण फिरणार्‍यांमुळे आता पोलीस देखील हतबल झाले आहेत. करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णावर शुक्रवारी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे डॉक्टर्स आणि नर्समध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यांच्याकडे करोना प्रतिबंधात्मक सुरक्षा कीट नाही. अशा परिस्थितीत जीव धोक्यात घालून सेवा कशी द्यायची? असा सवाल उपस्थित करत डॉक्टर्स आणि नर्स यांनी कामावर येण्यास नकार दिला आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत. त्या रुग्णाची तपासणी करणारे डॉक्टर्स आणि नर्स तसेच गेल्या दोन दिवसांत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने संपूर्ण मेहरुण परिसर सील केला आहे. एवढेच काय तर या भागातील अनेक गल्लीबोळांमध्ये नागरिकांनी बंदचे फलक लावून रस्ते बंद केले आहेत. विचार करा आतापर्यंत केवळ एकच रुग्ण सापडला तरी ही परिस्थित आहे तर विचार करा रुग्णांची संख्या वाढली तर काय होईल? त्यात चिंतेचे कारण म्हणजे मेहरूण परिसरात राहणारा हा पॉझिटिव्ह रुग्ण मुंबईत ट्रॅव्हल्सवर चालक आहे. धर्मप्रचारक असल्याने त्याने काही मशिदींमध्येही भेटी दिल्याचे बोलले जात आहे. गेले दहा दिवस हा रुग्ण अनेकांच्या संपर्कात आल्याने रुग्णांची संख्या वाढण्याची भीती आहे. यामुळे किमान आतातरी जातपात किंवा धर्माच्या पलीकडे जावून केवळ मानवतेच्या दृष्टीकोनातून सर्वांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. लॉकडाऊनमध्ये लोकांनी घरातच राहणे प्रशासनाला अपेक्षित आहे. मात्र जळगाव शहरासह जिल्हाभरात वेगळेच चित्र दिसून येत आहे. पोलीस आले की, लोक दुसरा रस्ता पकडतात पण ते गेल्यावर काही नागरिक बिनधास्तपणे रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात लॉकडाऊनचा प्रभाव अधिक दिसून येत आहे कारण येथे गावकर्‍यांनीची जबाबदारी उचलली आहे. गावातील प्रतिष्ठीत लोक पोलीस व प्रशासनाला सहकार्य करत आहेत. तसेच गावातील जो कोणी विनाकारण फिरतांना आढळेल त्याला समज देखील दिली जात आहे. परंतू शहरी भागात स्वैरपणा अधिक दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्यासाठी केवळ एक कोरोना रुग्ण पुरेसा ठरू शकतो, हे विसरुन चालणार नाही. याकरीता विषाची परीक्षा घेवू नका….

Copy