जळगावात सेवानिवृत्त मुख्याध्यापकाकडे घरफोडी

House Burglary Of Retired Headmaster In Jalgaon  जळगाव : घर बंद असल्याची संधी चोरट्यांच्या पथ्थ्यावर पडली. शहरातील सदाशिव नगरातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक मुलाकडे पुण्याला गेल्यानंतर घर बंद पाहून चोरट्यांनी चोरी केली. सोन्याचे दागिने आणि रोकड मिळून 67 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लांबवण्यात आला. या प्रकरणी रविवार, 26 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घर चोरट्यांना मिळाली आयतीच संधी
नारायण गरबड चौधरी (69, रा.जुना खेडी रोड, सदाशीव नगर, जळगाव) हे आपल्या पत्नीसह वास्तव्याला आहेत. ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून 10 ऑगस्ट रोजी नारायण चौधरी हे पत्नीसह पुणेस्थित मुलाकडे गेले होते तर इकडे गेल्या दीड महिन्यांपासून घर बंद असल्याने चोरट्यांनी 10 ऑगस्ट ते 24 सप्टेंबर दरम्यान संधी साधली. बंद घराच्या दरवाजाचे सेंटर लॉक तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने लांबवले. हा प्रकार चौधरी यांच्या घराच्या शेजारी राहणार्‍यांच्या लक्षात आल्याने त्यांनी नारायण चौधरी यांना फोन करून घरात चोरी झाल्याचे सांगितले.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
चौधरी हे पुण्याहून रविवार, 25 सप्टेंबर रोजी जळगावातील राहत्या घरी आल्यानंतर त्यांना घरात सर्व सामान अस्तव्यस्त पडलेला दिसून आला. घरातून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा एकूण 67 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी रविवारी दुपारी तीन वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.