Private Advt

जळगावात व्यापार्‍यास मारहाण : दोघांविरोधात गुन्हा

जळगाव : शहरातील फुले मार्केटमध्ये व्याजाच्या पैशांच्या कारणावरुन व्यापार्‍यास मारहाण करण्यात आली. या प्रकरणी दोन जणांविरोधात जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात सनी इंद्रकुमार साहित्या (26) हा तरुण वास्तव्यास आहे. त्याचे फुले मार्केटमध्ये बाबुजी फुटवेअर नावाने दुकान आहे. सनी साहित्या याने जैनाबाद येथील रुपेश सोनार याच्याकडून 60 हजार रुपये घेतलेले होते. घेतलेले पैसे ठरलेल्या व्याजासह म्हणजेच एकूण 1 लाख 91 हजार 500 रुपये सनी साहित्या याने रुपेश याच्या बँक खात्यावर जमा करुन परत केली होती मात्र यानंतरही अजून व्याजाचे पैसे द्यावे या या कारणावरुन 9 मार्च ते 17 मे दरम्यान रुपेश सोनार यांच्यासह चिराग शिरसाठ या दोन जणांनी वेळोवेळी फुले मार्केट येथील दुकानावर येवून सनी साहित्या यास शिवीगाळ करत मारहाण केली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा सनी याने दिलेल्या तक्रारीवरुन मंगळवारी रुपेश सोनार व चिराग शिरसाठ (दोन्ही रा.जैनाबाद) या दोघांविरोधात शहर पोलिसात महाराष्ट्र सावकारी अधिनियमांतर्गत तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र सोनार करीत आहेत.