जळगावात मुलाखती झालेल्या सर्वांची वैद्यकीय अधिकारीपदी नियुक्ती

0

मुक्ताईनगर : जिल्हाभरातील रिक्त वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे भरण्यासाठी 38 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्या सर्व उमेदवारांना भरती करण्याचा निर्णय आरोग्य विभागातर्फे घेण्यात आला आहे. माजी महसूलमंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांची भेट घेतली यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सावदा येथील ग्रामीण रूग्णालयासाठी विविध पदांना येत्या आठ दिवसात मंजूरी देण्यात येणार आहे. यासह विविध निर्णय घेण्यात आले असून या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी शनिवारी सहसचिव व उपसंचालक जळगावात येणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, या बैठकीत आरोग्य मंत्र्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक भामरे यांना खडसावून कामात सुधारणा करण्याचे आदेश दिले आहे. अन्यथा कारावाईचा इशारा दिला आहे.

बैठकीत आमदार एकनाथराव खडसे यांच्यासह आमदार सुरेश भोळे, उपजिल्हाधिकारी पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक भामरे उपस्थित होते. जिल्ह्यात 26 वैद्यकीय अधिकार्‍यांच्या जागा रिक्त असल्याने त्यांच्या भरतीसाठी 38 उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या. त्या सर्व उमेदवारांना भरती करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

बैठकीत झाले हे महत्त्वाचे निर्णय
सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकार्‍यांच्या रिक्त जागा त्वरीत भरण्यात येतील, जळगाव येथील महिलांचे स्वतंत्र 100 खाटांचे सामान्य रुग्णालयासाठी चालू अर्थसंकल्पात 10 लाख रुपयांची तरतूद करण्यात येवून निविदा प्रकाशित करण्यात येणार आहे. सावदा येथे 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी देण्यात आली असून आकृतीबंधानुसार वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, एक अधिक्षक, तीन वैद्यकीय अधिकारी अशा पदांना आठ दिवसात मंजुरी देण्यात येणार आहे. तात्पुरत्या स्वरुपात येथे वैद्यकीय अधिकारी प्रतिनियुक्तीवर देण्यात येणार आहे. यासाठी लवकरच शासन निर्णय घेणार असून तोपर्यंत शहरातील वैद्यकीय अधिकारी सेवा देण्यास तयार असतील तर योग्य मानधन तत्वावर नियुक्त करण्याची मान्यता आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.

कारवाईचा इशारा
जिल्ह्यात आरोग्याच्या संदर्भात अनेक समस्या उद्भवत असतांना जिल्हा शल्य चिकित्सक भामरे यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे तक्रारींची दखल घेत येत्या तीन महिन्यात सर्व समस्यांवर लक्ष केंद्री करून सुधारणा कराव्यात अन्यथा कारवाई करू असा इशारा आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी भदिला आहे.