Private Advt

जळगावात भाजीपाला विक्रेत्याला मारहाण : तिघांविरोधात गुन्हा

जळगाव : किरकोळ कारणावरून भाजीपाला विक्रेत्याला तिघांनी मारहाण करीत गंभीर दुखापत केली. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कासमवाडीतील आठवडे बाजारात भाजीपाल्याचे दुकान लावण्याच्या कारणावरून हा वाद घडल्याचे सांगण्यात आले.

ठार मारण्याची धमकी देत मारहाण
जळगाव शहरातील कासमवाडी भागात दर शनिवारी आठवडे बाजार भरतो. आठवडे बाजार बाजारातील उर्दू शाळेसमोर प्रशांत सोमनाथ बडगुजर (36, रा. इंदिरानगर महादेव मंदिराजवळ, शिरसोली) हा तरुण भाजीपाला विक्री करण्याचे दुकान लावतो. शनिवारी देखील त्याने भाजीपाला विक्रीचे दुकान लावले मात्र सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दुकान लावण्याच्या कारणावरून आणि भाजीपालाचे उधारीचे पैसे मागण्याच्या कारणावरून भैय्या संतोष धोबी उर्फ टेलर, गणेश समाधान मराठे, रेखाबाई समाधान मराठे (सर्व रा.स्मशानभूमीजवळ, मेहरुण) यांनी प्रशांत बडगुजर याला शिवीगाळ करून मारहाण केली तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा
एका संशयीताने लोखंडी दांडा प्रशांतच्या डोक्यावर तसेच पाठीवर मारला. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी सोमवार, 14 मार्च रोजी दुपारी प्रशांत बडगुजर यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी भैय्या संतोष धोबी, गणेश समाधान मराठे, रेखाबाई समाधान मराठे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप पाटील करीत आहे.