Private Advt

जळगावात भरधाव ट्रकने विवाहितेला चिरडले : भाचा गंभीर जखमी

मुलगी पाहण्यासाठी जाताना क्रुर काळाची झडप : नातेवाईकांचा आक्रोश

जळगाव : धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे भाच्यासाठी मुलगी पाहण्यासाठी निघालेल्या रावेर तालुक्यातील रेंभोटा गावातील विवाहितेचा जळगावात दुचाकी अपघातात जागीच मृत्यू झाला तर भाचा गंभीर जखमी झाला. हा अपघात द्वारका नगराजवळ गुरुवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडला. विवाहितेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात मन हेलावणारा आक्रोश केला. कविता मुकेश कोळी (30, रेंभोटा, ता.रावेर असे) मयत विवाहितेचे नाव आहे तर या अपघातात महिलेचा भाचा अजय कमलाकर सोनवणे हा जखमी झाला.

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक
रावेर तालुक्यातील रेंभोटा येथे कविता मुकेश कोळी (30) या पती व दोन मुलांसह वास्तव्याला असून गावातच त्यांचा भाचा अजय कमलाकर सोनवणे राहतो. अजयसाठी मुलगी पाहण्यासाठी गुरुवारी सकाळी अजयसह कविता कोळी हे मामी-भाचे एकाच दुचाकीने धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावाला जाण्यासाठी निघाले होते मात्र जळगाव शहराच्या पुढे द्वारका नगराजवळ राष्ट्रीय महामार्गावरून जाताना मागून येणार्‍या ट्रक (एम.एच.29 एम.0144) ने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने कविता कोळी या रस्त्यावर पडताच त्यांच्या अंगावरून मागून येणारा ट्रक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर अजय सोनवणे हा जखमी झाला. गुरूवार, 28 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजता हा अपघात घडला. या अपघातात अजय जखमी झाल्याने त्यास खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जळगाव तालुका पोलिसांची धाव
अपघातानंतर जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी पोलिस नाईक ज्ञानेश्वर कोळी, बापू कोळी, प्रशांत पाटील यांनी धाव घेवून जखमीस तातडीने उपचारासाठी रवाना केले तर मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात हलवण्यात आला. नातेवाईकांची प्रचंड गर्दी जमली होती. अपघाताला कारणीभूत ठरलेला ट्रक जळगाव तालुका पोलिसांना ट्रक ताब्यात घेतला आहे.