जळगावात बंदी असतानाच नायलॉन मांजा विक्री : चौघांविरोधात गुन्हा

भुसावळ/जळगाव : नायलॉन मांजा विक्री व वापराला बंदी असतानाही शहरातील पिंप्राळा परीसरात विना परवाना नायलॉन मांजाची विक्री करणार्‍या चौघांविरोधात रामानंद नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुरूवार, 13 जानेवारी रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशान्वये मकरसंक्रातहच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा विक्री करण्यास बंदी आहे मात्र असे असतांना शहरातील पिंप्राळा भागात काही भागात दुकानदार विना परवाना असलेला नॉयलॉन मांजाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती रामानंद नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांना गुरूवारी दुपारी मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले. रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल हरीष डोईफोडे आणि उमेश पवार यांनी पिंप्राळा परीसरात दोन ठिकाणी कारवाई केली. दोन्ही दुकानांवर प्रत्येकी तीन हजार 350 आणि एक हजार 100 असा एकूण चार हजार 450 किंमतीचा प्रतिबंधीत नायलॉन मांजा जप्त करण्यात आला.

यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा 
या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात हवालदार हरीष डोईफोडे यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी अनिल बळीराम वाणी (रामानंद नगर), अब्दुल हक अब्दुल अजीज (पिंप्राळा), विजय माखनलाल सोनी (नलिनी नगर, पिंप्राळा), निलेश सुरेश सुर्यवंशी (रामानंदनगर) या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक राजेश चव्हाण आणि जितेंद्र तावडे करीत आहे.