Private Advt

जळगावात फ्रीज भरलेल्या कंटेनरला आग : लाखोंचे नुकसान

जळगाव : रेल्वे मालधक्क्यावर उभ्या असलेल्या व फ्री भरलेल्या मालवाहू कंटेनरला शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने सुमार 64 फ्रिज आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने 30 लाखांवर नुकसान झाले. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

अचानक कंटेनरला आग
जळगाव रेल्वे स्थानकाजवळ मोठा मालधक्का असून दररोज त्याि ठकाणाहून मालाची आवक-जावक होत असते. जळगाव येथील एस.के.ट्रान्सलाईनच्या वाहनातून दररोज इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर साहित्याची वाहतूक केली जाते. शुक्रवारी पुणे येथून फ्रिजसह काही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन काही कंटनेर जळगावकडे निघाले होते. चालक जामीद खान हे कंटेनर (क्रमांक एम.एच.19.सीवाय.2511) ने सकाळी 9 वाजेपूर्वी जळगावात पोहचले. कंटेनरमधील साहित्य रेल्वेने कोलकाता येथे पाठवायचे असल्याने मालधक्क्याजवळ कंटनेर लावून चालक त्यात झोपले होते मात्र सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट होऊन कंटेनरला आग लागली.

30 लाखांचे नुकसान
काही क्षणात आग पसरल्याने कंटनेरमधील फ्रिज आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आग आणि धुराचे लोळ उठू लागल्याने परीसरात गर्दी जमली. रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. जळगाव शहर मनपाच्या तीन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात आणली. या आगीत कंटेनरमधील सुमारे 64 फ्रीज आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने सुमारे 30 लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.