जळगावात धाडसी घरफोडी : सहा लाखांचा ऐवज लंपास

0

उच्चभ्रू वस्ती जय नगरातील घटना ; साडेपाच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

जळगाव- शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या जय नगरातल वृद्ध महिला तीर्थयात्रेसाठी गेल्याने दुमजली बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप कटरने कापून चोरट्यांनी बंगल्यातील पाच खोल्यांमधील कपाटे फोडून चोरट्यांनी सहा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. रमिला पुरूषोत्तम मंडोरे 70) यांच्या घरी हा प्रकार घडला आहे. मंडोरे ह्या बंगल्यात एकट्याच राहतात. त्या 23 सप्टेंबरपासून तीर्थयात्रेस (कुरूक्षेत्र) गेल्या आहेत. त्यांच्या शेजारी राहणारे अदीत बिजोरिया हे देखील तीन दिवसांपासून पुण्याला गेले होते. बिजोरिया हे सोमवारी रात्री घरी परतले. या वेळी मंडोरे यांच्या बंगल्यातील सर्व लाईट, पंखे सुरू होते. हे पाहुन त्यांनी मंडोरे यांच्यासह त्यांच्या मुलींना कळवले. त्यांच्या मुलींनी घरी येऊन तपासणी केली असता घरफोडी झाल्याचे निष्पन्न झाले. चोरट्यांनी लोखंडी चॅनल गेट वाकवून नंतर दरवाजाचे कुलूप कटरच्या साह्याने तोडले. यानंतर हॉल, देवघर व वरच्या मजल्यावरील तीन खोल्यांमधील प्रत्येक कपाट, ड्रावर फोडून तपासणी केली. एका कपाटातून पाच लाख 37 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व 73 हजार रुपये रोख असा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे. तसेच चोरट्यांनी घरातील सर्व वस्तू अस्ताव्यस्त केल्या. अत्यंत शांततेत व बराच वेळ घरात राहून त्यांनी ही चोरी केल्याचे दिसून आले. मंगळवारी सकाळी मंडोरे यांच्या तिन्ही मुली बाहेरगावाहून घरी आल्या. त्यांनी संपूर्ण घराची तपासणी करून मंडोरे यांना कळवले. घरातील सोने व रोख रक्कम लंपास झाल्याचे मंडोरे यांनी सांगितले. रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.

Copy