Private Advt

जळगावात दोन गटात दंगल : तुफान दगडफेकीत दोन होमगार्ड जखमी ; आठ आरोपींना अटक

उसनवारीच्या पैशांवरून पेटला वाद : पोलिसांना ठार मारण्याची धमकी देत मोबाईलही फोडला : दोन्ही गटाविरोधात पोलिसांनीच दाखल केली तक्रार

भुसावळ/जळगाव : शनी पेठ पोलिस ठाणे हद्दीतील राधाकृष्ण मंदिर प्रवेशद्वार ते काट्या फाईल गटात दोन गटात उसनवारीच्या पैशांवरून झालेला शाब्दीक वाद धक्का-बुक्कीवर पोहोचल्यानंतर दोन्ही गट समोरा-समोर आल्यानंतर तुफान दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत दोन होमगार्ड जखमी झाले आहेत. या प्रकरणी रात्री उशिरा दोन्ही गटाविरोधात शनी पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही गटातील आरोपींना अटक करण्यात आली. दरम्यान, आरोपींच्या दगडफेकीत होमगार्ड भावेश रमेश कोठावदे व होमगार्ड विलास भटा देसले हे जखमी झाले असून आरोपींनी पोलिसांचा मोबाईल फोडल्याचे उघड झाले आहे.

उसनवारीच्या पैशावरून दोन गट भिडले
शहरातील काट्याफाईल भागात उसनवारी घेतलेल्या पैशांवरून झालेल्या वादानंतर मुलाला मारहाण करण्यात आली व या प्रकारानंतर दोन समाजातील गट समोरा-समोर भिडल्यानंतर तुफान दगडफेक करण्यात आली. रविवारी रात्री 10.30 ते 11 वाजेदरम्यान घडलेल्या प्रकारानंतर नागरीकांची पळापळ होऊन तणाव निर्माण झाला. जमावाने एका दुचाकीची मोडतोड केल्याचा प्रकारही उघड झाला आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षकांची धाव
दोन गटात सुरू असलेल्या दंगलीची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे, शहर पोलिस ठाण्याचे विजयकुमार ठाकूरवाड यांच्यासह दंगा नियंत्रण पथकाने धाव घेतली. पोलिसांचा ताफा आल्यानंतर दगडफेक करणारे दोन्ही गट पळून गेले.

पोलिस आल्यानंतरही दगडफेक
काट्याफाईल भागात दोन गटात सुरू असलेल्या दगडफेकीची माहिती शनीपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस पथक पोहोचल्यानंतर दोन्ही गटाने दगड भिरकावणे सुरूच ठेवले तर पोलिसांनाही जीवे ठार मारण्याची धमकी यावेळी आरोपींनी देत चित्रीकरण करताना मोबाईल फोडण्यात आला तसेच दोन होमगार्डवर दगडफेक करण्यात आल्याने भावेश रमेश कोठावदे व होमगार्ड विलास भटा देसले हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी एएसआय नंदकिशोर यशवंत पाटील यांच्या फिर्यादीनुसार दोन्ही गटातील नऊ आरोपींसह अन्य 30 अनोळखींविरोधात दंगल व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला तर दोन्ही गटातील आठ आरोपींना अटक करण्यात आली. तपास शनीपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे करीत आहेत.