Private Advt

जळगावात दाम्पत्याला मारहाण : शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव : मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप करीत शिवसैनिकांनी दाम्पत्याला आयनॉक्स थिएटरबाहेर रविवारी बेदम मारहाण केली. या मारहाणीत दाम्पत्यास गंभीर दुखापत झाली असून महिलेल्या गळ्यातील मंगळसूत्र गहाळ झाले. या प्रकरणी प्रमुख पदाधिकार्‍यांसह शिवसैनिकांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहर पोलिसात दिली तक्रार
धरणगाव येथील हेमंत नवनीतलाल दुतिया (48, रा.भाटीया गल्ली) हे कॉटन जिनिंग मिलमध्ये नोकरीस आहेत. रविवार, 27 रोजी पत्नी, लहान मुलगी व सासरे हारेश प्रेमजी भाटे यांच्यासोबत दुपारी तीन वाजता खान्देश सेंट्रल मॉलमधील आयनॉक्स थिएटरमध्ये चित्रपट बघण्यासाठी आले होते. चित्रपट सुटल्यानंतर सायंकाळी 6.45 वाजेच्या सुमारास ते चित्रपटगृहाच्या बाहेर आले असता यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, राजेंद्र किसन महाजन (रा.लहान माळीवाडा, धरणगाव), धिरेंद्र पुरभे, गजानन मालपुरे, महानगरप्रमुख शरद तायडे, शोभा चौधरी, सरीता माळी-कोल्हे, भीमा धनगर (रा.नेहरुनगर, धरणगाव) यांच्यासह चार ते पाच जणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट का टाकली? असे म्हणत बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी हेमंत दुतिया यांच्या तक्रारीवरुन मारहाण करणार्‍या शिवसैनिकांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.