Private Advt

जळगावात दगडफेक ; जखमी तरुणाचा मृत्यू ; सहा संशयीत ताब्यात

जळगाव : शहरातील शिवाजी नगर हुडको परीसरात 30 डिसेंबर रोजी रात्री दोन गटात दगडफेक होऊन दंगल उसळली होती. या दंगलीत जखमी झालेला शकील अली उस्मान अली (30, रा. शिवाजी नगर हुडको) या तरूणाचा गुरूवार, 6 जानेवारी दुपारी 2 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

किरकोळ कारणावरून उसळली होती दंगल
शिवाजी नगर हुडको परीसरात 30 डिसेंबर रोजी रात्री दोन गटात किरकोळ कारणावरुन दगडफेक होऊन दंगल उसळली. घराबाहेर सुरू असलेल्या दंगलीत आपल्या भाच्याचा सहभाग तर नाही ना? अशा काळजीपोठी त्याला पाहण्यासाठी शकील अली उस्मान अली हा तरुण घराबाहेर आला असता त्याच्या डोक्याला दगड लागला त्यात तो खाली पडल्यामुळे डोक्याच्या मागच्या बाजुसही जबर दुखापत झाली. दोन दिवस खागी रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर शकील घरी गेला होता. त्यानंतर बुधवार, 5 जानेवारी रोजी पुन्हा तब्बेत खालावल्याने तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. उपचार सुरू असताना गुरुवार, 6 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.