Private Advt

जळगावात चोरट्यांचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

जळगाव : शहरातील पिंप्राळा रोडवरील प्रेम नगर पेट्रोल पंपाजवळील बँक ऑफ इंडियाचे एटीएम मध्यरात्री चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने त्यात यश आले नाही. जळगाव जिल्ह्यात नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील आले असतानाच उघडकीस आलेल्या या घटनेनंतर खळबळ उडाली आहे.

मोठी आर्थिक हानी टळली
शहरातील बजरंग बोगद्याजवळ आणि पिंप्राळा रोडवरील प्रेम नगर पेट्रोलपंपाजवळ असलेल्या बँक ऑफ इंडियाचे एटीएम मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. अज्ञात चोरट्यांनी सुरूवातीला एटीएमच्या बाहेरचा आतल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यावर स्प्रेने काळा रंग मारला. त्यानंतर दगडाने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. एटीएम मशीन न फुटल्याने चोरट्यांना रीकामे हाती परतावे लागले.

जिल्हा पेठ पोलिसांची धाव
बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास प्रेम नगरातील नागरीकांच्या लक्षात एटीएम फोडण्याचा प्रकार लक्षात येताच त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्याला माहिती कळवली. जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून माहिती घेतली.