जळगावात घरगुती गॅसचे वाहनांमध्ये अवैध रीफिलिंग : दोघांना अटक

जळगाव : घरगुती वापराच्या गॅसचे वाहनांमध्ये अवैधरीत्या रीफिलिंग करणार्‍या रॅकेटचा एमआयडीसी पोलिसांनी भंडाफोड करीत दोघांना अटक केली. मास्टर कॉलनतील कारवाईत रीकामे सिलिंडर, गॅस भरण्याच्या मशीनसह 68 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एमआयडीसी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सिराज खान रज्जाक खान उर्फ शेराखान (30, मास्टर कॉलनी) व जहांगीर रफिक पटेल (44, रा.सदाशीवनगर, शेरा चौक) अशी अटक केलेल्या दोन्ही संशयीतांची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगावातील मास्टर कॉलनीत जळगाव किराणाच्या मागील बाजूस बेकायदेशीररित्या घरगुती सिलिंडरमधून गॅस वाहनांमध्ये भरून दिला जात असल्याची गोपनीय माहिती सहा.पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली. चिंथा यांनी जिल्हापेठचे सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोलिस नाईक सलीम तडवी, रवींद्र मोतीराया , महेश महाले, समाधान पाटील यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना केल्या. पथकाने बुधवारी, 10 नोव्हेंबर रोजी 8.30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मास्टर्स कॉलनीत छापा टाकला. या ठिकाणी एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैधपणे घरगुती गॅस सिलिंडरमधुन इतर सिलेंडर वाहनांमध्ये गॅस भरला जात असल्याचा प्रकार समोर आला. पोलिसांनी घटनास्थळावरून सिराज खान रज्जाक खान उर्फ शेराखान (वय 30, मास्टर कॉलनी) व जहांगीर रफिक पटेल (44, सदाशीवनगर, शेरा चौक) या दोघांना अटक करण्यात आली.

68 हजारांचा मुद्देमाल जप्त
या ठिकाणाहून पथकाने रोख रक्कम एक हजार 920 रुपये, 8 हजार 480 रुपयांचे चार भरलेले सिलेंडर, 28 हजार 800 रुपये किंमतीचे एकूण 24 रीकामे सिलेंडर, एक हजार 200 रुपयांचे एक इंडियन कंपनीचे रिकामे सिलेंडर, एक हजार 200 रुपयांचे एक एच.पी.कंपनीचे राीकामे सिलेंडर, 15 हजारांचा इलेक्ट्रॉनिक वजन काटा व 12 हजारांचा गॅस भरण्याचा पंप असा एकूण 68 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सहा.निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Copy