जळगावात काकांचा खून : पसार पुतण्या अखेर गुन्हे शाखेच्या जाळ्यात

जळगाव : काकांचा खून करून पसार झालेल्या आरोपी पुतण्याच्या जळगावच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. सुरज उर्फ विशाल अनिल सोनवणे (33, रा.आंबेडकर नगर, जुने जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपी सुरजला जळगाव न्यायालयात हजर केले असता 12 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शहरातील आंबेडकर नगर भागातील रहिवासी राजू पंडित सोनवणे (56, रा.रामपेठ आंबेडकर नगर, बौद्ध विहारासमोर, जळगाव) यांची 12 सप्टेंबर रोजी मध्यरात्री संशयीत आरोपी सुरज सोनवणे यांनी डोक्यावर लाकडी दांडा मारून हत्या केली व त्यानंतर पळ काढला होता. या प्रकरणी शनी पेठ पोलिसात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

काकांबद्दल द्वेष वाढल्याने केला खून
अटकेतील संशयीत सुरज हा बेरोजगार असताना नेहमीच व्यसन करीत असल्याने त्यास मयत व नात्याने काका असलेले राजू सोनवणे बोलत होते व बोलण्याचा राग आल्याने आरोपीने डोक्यात लाकडी दांडका मारून त्यांची हत्या केली व पळ काढला होता. आरोपी पसार झाल्यानंतर त्याचा जळगाव गुन्हे शाखेने शोध सुरू केला होता. आरोपी जळगावातील भोईटे नगर भागातील रेल्वे मालधक्का परीसरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली. ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, राहुल पाटील, प्रीतम पाटील यांच्या पथकाने केली. आरोपीला अधिक कारवाईसाठी शनीपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तपास पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Copy