Private Advt

जळगावातील सिंधी कॉलनीतील घरफोडीचा उलगडा : दोन्ही आरोपी जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात

जळगाव : शहरातील सिंधी कॉलनीतील बंद घरातून चोरट्यांनी अडीच लाखांच्या रोकडसह सोन्याचे दागिने मिळून पाच लाखांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मंगळवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्यातील दोघा आरोपींच्या मुसक्या बांधल्या आहेत. समीर हनीफ काकर (20, रा.बिस्मिल्ला चौक, तांबापुरा, जळगाव) व अन्सार शहा रूबाब शहा (19, मच्छिबाजार, तांबापुरा, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपींना अधिक तपासासाठी जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

पाच लाखांच्या घरफोडीची उकल
जळगावच्या सिंधी कॉलनीतील रहिवासी रोहित इंद्रकुमार मंधवाणी यांच्या बंद घरातून 22 ते 25 एप्रिल दरम्यान चोरट्यांनी चार लाख 97 हजारांचा मुद्देमाल लांबवला. मंधवाणी हे अमरावती येथे लग्नाला गेल्याची संधी चोरट्यांनी साधली होती. चोरट्यांनी अडीच लाखांच्या रोकडसह सव्वा दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 20 हजार रुपये किंमतीची मिक्सरसाठी लागणा-या एकूण 40 इलेक्ट्रीक मोटारी, दोन हजार शंभर रुपये किंमतीचे प्रत्येकी 10 ग्रॅम वजनाचे एकूण 60 ग्रॅम चांदीचे सहा शिक्के मिळून चार लाख 97 हजार 100 रुपये किंमतीचा ऐवज लांबवला होता. या प्रकरणी मंगळवारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासात गुन्हे शाखेने आरोपींच्या मुसक्या बांधल्या.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे, हवालदार विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, ईश्वर पाटील प्रमोद ठाकूर आदींच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.