Private Advt

जळगावातील व्यावसायीकांनी घाऊक व्यावसायीकांना 60 लाखात फसवले : दोघांविरोधात गुन्हा

जळगाव : जळगावातील दोघा भावंडांनी इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या शोरूमसाठी भुसावळसह जिल्ह्यातील व्यावसायीकांकडून उधारीने महागडे उपकरणे घेतली मात्र आठ वर्ष होवूनही रक्कम न फेडल्याने त्यांच्याविरोधात जळगाव शहर पोलिसात सुमारे 60 लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हा आकडा वाढण्याची भीती आहे. निलेश व दिनेश शांताराम पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

आधी विश्वास केला संपादन नंतर केला ‘घात’
जळगाव शहरातील नाथ प्लाझा येथे श्री इलेक्ट्रॉनिक्स नावाने निलेश शांताराम पाटील व दिनेश शांताराम पाटील यांच्या मालकीचे इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीचे दुकान होते. 31 जुलै 2013 ते 31 मार्च 2021 दरम्यान निलेश आणि दिनेश यांनी विविध घाऊक व्यावसायिकांकडून फ्रिज, एलईडी, वाशींग मशीन, टीव्ही, इलेक्ट्रॉनिक वस्तू असे साहित्य खरेदी केले होते. काही वेळी व्यवहार रोखीने तर काही वेळी ते उधारीने व्यवसाय करीत होते. घाऊक व्यावसायीकांशी संबंध जोपासल्यानंतर दोघांनी उधारी वाढविण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षभरापासून घाऊक व्यावसायिक निलेश आणि दिनेश यांच्याकडे पैशांची मागणी केली असता यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. तसेच शोरूम देखील बंद केले. व्यावसायीकांनी घरी जाऊन त्यांचा शोध घेत पैशांची मागणी केली असता तरीही त्यांनी दाद दिली नाही. अखेर काही व्यावसायिकांनी एकत्र येत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महेंद्र सतीशचंद्र ललवाणी यांनी निलेश शांताराम पाटील व दिनेश शांताराम पाटील यांच्याविरुद्ध फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

60 लाखांना घातला गंडा
फिर्यादीनुसार निलेश पाटील व दिनेश पाटील यांनी महेंद्र ललवाणी, समर एजन्सी 11 लाख 86 हजार 73 रुपये, कैलास छाबरा, कैलास डिस्ट्रिब्युटर्स 12 लाख 72 हजार 688 रुपये, निलेश रवींद्र वालेचा, शिव एजन्सीज 19 हजार 615 रुपये, प्रकाश मोहनलाल कृपलानी, कैलास टीव्ही भुसावळ 2 लाख 86 हजार 354 रुपये, अनिल प्रकाश कृपलानी, महादेव टीव्ही सेंटर भुसावळ 8 लाख 32 हजार 952 रुपये, सुरेश दर्शनलाल वालेचा, शिव सेल्स 4 लाख 99 हजार 372 रुपये, अभिजित जमादार, केव्ही इंटरप्रायझेस धुळे 92 हजार 160 रुपये, देविदास हरिभाई वेद, आदीदेव इंटरप्रायजेस 1 लाख 55 हजार 300 रुपये, राजेश उत्तमचंद बाग, बहार होम अप्लायन्सेस पुणे 14 लाख 10 हजार 199 रुपये, कैलास वरदमल छाबरा, कैलास डिस्ट्रिब्युटर्स 2 लाख 67 हजार 930 रुपये अशी एकूण 60 लाख 22 हजार 643 रुपयांची फसवणूक केली.